नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने शनिवारी ही नियुक्ती केली. या समितीचे सचिव मनीष सक्सेना यांनी या नियुक्तीची माहिती दिली.
सध्या २०१९ पासून पी. के. मिश्रा हे पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव-१ आहेत. तर शक्तिकांत दास हे दुसऱ्या क्रमांकावर असतील. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील.
शक्तिकांत दास हे तामिळनाडू तुकडीचे १९८० बॅचचे आयएएस अधिकारी होते. आरबीआयच्या गव्हर्नरपदी त्यांनी २०१८ ते २०२४ या दरम्यान काम केले. कोविड महामारी आणि त्यानंतरच्या देशाची आर्थिक सुधारणा, यासह महत्त्वपूर्ण आर्थिक आव्हानांचा सामना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२१ मध्ये केंद्र सरकारने शक्तिकांत दास यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे २५वे गव्हर्नर होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारसाठी विविध पदांवर काम केले आहे. केंद्रात त्यांनी विविध टप्प्यांवर आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव आणि खत सचिव म्हणून काम केले. दास यांनी यापूर्वी भारताचे ‘जी-२०’ चे शेर्पा, १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य आदी पदे सांभाळली आहेत. ४२ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात दास यांनी अर्थ, गुंतवणूक, मूलभूत क्षेत्रात काम केले आहे. तर पी. के. मिश्रा हे गुजरात तुकडीचे निवृत्त अधिकारी आहेत.
७५व्या दिवशी पीएमओमध्ये
शक्तिकांत दास हे आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून १० डिसेंबरला निवृत्त झाले होते. आता २२ फेब्रुवारी रोजी त्यांना पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले. म्हणजेच, निवृत्तीनंतरच्या ७५व्या दिवशी ते पंतप्रधान कार्यालयात एका महत्त्वाच्या पदावर पोहोचले.