नवी दिल्ली : वोडाफोन-आयडिया कंपनीत सरकारने ४९ टक्के समभाग खरेदी करण्याचे ठरवले आहे. सरकारला देण्यात येणाऱ्या स्पेक्ट्रमची रक्कमेची भरपाई समभागाद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती एक्स्चेंजला वोडाफोन आयडियाने दिली आहे. सध्या सरकारकडे वोडाफोन-आयडियाचे २२.६० टक्के समभाग आहेत. आता सरकारला कंपनीचे आणखी ३६,९५० कोटी रुपयांचे समभाग मिळणार आहेत. यानंतरही कंपनीचे नियंत्रण प्रवर्तकांकडे राहणार आहे.
वोडाफोन आयडियाने सांगितले की, दूरसंचार खात्याने २९ मार्च रोजी याबाबतचा आदेश दिला होता. कंपनीला हा आदेश ३० मार्चला मिळाला आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर २०२१ च्या दूरसंचार सुधारणा पॅकेजअंतर्गत केली जात आहे.
या प्रक्रियेतंर्गत कंपनी येत्या ३० दिवसात ३,६९५ कोटी समभाग जारी करणार आहे. याचे दर्शनी मूल्य १० रुपये असणार आहे. शेअरचा दर गेल्या ९० दिवसांचा किंवा २६ फेब्रुवारी २०२५ च्या १० दिवसांच्या सरासरी दरांवर निश्चित केला जाणार आहे.
शुक्रवारी वोडाफोन आयडियाचा समभाग ६.८१ रुपये होता. गेल्या आठवड्याभरात समभाग १० टक्के घसरला आहे. तर एका वर्षांपासून अधिक काळ हे समभाग ठेवणाऱ्यांना ४८ टक्के नुकसान झाले आहे.