(Photo-X)
राष्ट्रीय

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त

गुरुग्राममध्ये एका नवविवाहित महिलेची पतीने विषारी इंजेक्शन देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडा आणि छळामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

हरियाणातील गुरुग्राममध्ये एका नवविवाहित महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकेकाळी सहकारी म्हणून सुरू झालेलं नातं प्रेमात बदललं, त्याचं लग्नात परिवर्तन झालं, पण अवघ्या चार महिन्यांतच या नात्याचा अंत झाला. पतीनेच पत्नीची विषारी इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा आरोप होत असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सहकाऱ्यापासून आयुष्याच्या साथीदारापर्यंत

माहितीनुसार, गुरुग्राममधील एका नर्सिंग होममध्ये रेडिओलॉजिस्ट अरुण शर्मा आणि नर्स काजल एकत्र काम करत होते. दीर्घ वेळ एकत्र काम करताना त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे हे नातं प्रेमात बदललं. २०२५ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी लग्न केलं आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली.

लग्नानंतर सुरू झाला छळ

मात्र, लग्नानंतर काहीच दिवसांत परिस्थिती बदलली. काजलच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अरुण किरकोळ कारणांवरून तिच्यावर हात उगारू लागला. हुंड्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात होती आणि मानसिक तसेच शारीरिक छळ वाढत होता.

होळीनंतर वाद

४ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने हे दाम्पत्य काजलच्या कुटुंबासोबत गढी हरसरू येथे राहायला आले. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच १७ मार्च रोजी अरुणने मद्यधुंद अवस्थेत काजलला मारहाण केली.

त्यानंतर १८ मार्चला सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादानंतर काही वेळातच कुटुंबीयांना काजल बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यावेळी तिच्या नाकातून रक्त येत होते.

रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू

हा प्रकार पाहताच घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने काजलला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आनंदाने सुरू झालेलं आयुष्य इतक्या लवकर संपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विषारी इंजेक्शनचा संशय

घटनेनंतर कुटुंबीयांना घरातील शौचालयात एक सिरिंज आढळली. त्यामुळे अरुणने काजलला विषारी इंजेक्शन दिल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

पोलिस तपासात कबुली

पोलिस चौकशीत अरुणने पत्नीला विषारी इंजेक्शन दिल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, तो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील बेहटा हाजीपूर येथील रहिवासी आहे. त्याला अमली पदार्थांच्या व्यसनाची सवय असल्याची माहितीही समोर आली आहे.

पुढील तपास सुरू

"आरोपीला रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे," अशी माहिती गुरुग्राम पोलिसांनी दिली.

दरम्यान, शवविच्छेदनानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च