नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शुक्रवारी पुन्हा एकदा सभागृहात कलगीतुरा रंगला. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी खचून जाणार नाही. मी देशासाठी माझ्या प्राणांची आहुती देईन. विरोधकांना २४ तास एकच काम आहे, शेतकऱ्याचा मुलगा इथे का बसला आहे, मी खूप सहन केले आहे, तुम्हाला प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही संविधानाचा अपमान करत आहात, असे धनखड म्हणाले.
त्याला प्रत्युत्तर देताना खर्गे म्हणाले की, तुम्ही भाजप सदस्यांना इतर पक्षांच्या सदस्यांविरुद्ध बोलण्यासाठी प्रोत्साहित करत आहात. मी देखील एका मजुराचा मुलगा आहे, मी तुमच्यापेक्षा कठीण काळ पाहिला आहे. तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान करत आहात, तुम्ही काँग्रेसचा अपमान करत आहात, आम्ही येथे तुमचे गुणगान ऐकण्यासाठी आलेलो नाहीत, आम्ही येथे चर्चेसाठी आलो आहोत, असे खर्गे म्हणाले.
संसदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील गोंधळ शुक्रवारीही सुरूच राहिल्याचे पाहायला मिळाले. धनखड यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. यानंतर शुक्रवारी मल्लिकार्जुन खर्गे आणि जगदीप धनखड यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
या सर्व वादावर पडदा टाकण्यासाठी धनखड यांनी खर्गे आणि सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना आपल्या दालनात चर्चेसाठी निमंत्रित केले. मात्र, तुम्ही माझा अपमान करीत आहात तर मी आपला सन्मान कसा ठेवणार, असा संतप्त सवाल खर्गे यांनी केल्याचे पाहावयास मिळाले.