Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण 
राष्ट्रीय

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

देशात एलपीजी पुरवठा स्थिर असून घाबरून बुकिंग करणे कमी झाले आहे. सरकारने ५०% व्यावसायिक एलपीजी राज्यांच्या ताब्यात दिला असून आता...

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी टंचाईची भीती व्यक्त होत असताना, सध्या एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे. सोमवारी (दि. २३) झालेल्या आंतरमंत्रालयीन बैठकीत अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली.

पुरवठा सुरळीत

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, "गेल्या तीन आठवड्यांत सुमारे ३.५ लाख घरगुती आणि व्यावसायिक पीएनजी कनेक्शन सुरू करण्यात आले आहेत."

त्या पुढे म्हणाल्या, "एलपीजी पुरवठ्यावर लक्ष ठेवले जात असले तरी वितरक स्तरावर कुठेही तुटवडा नाही. घाबरून बुकिंग करण्याची प्रक्रिया आता कमी झाली असून वितरण पुन्हा नियमित झाले आहे."

व्यावसायिक एलपीजीवर राज्यांचा ताबा

व्यावसायिक एलपीजीबाबत महत्त्वाचा निर्णय घेत, सुमारे ५० टक्के साठा राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यांना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, ढाबे, औद्योगिक कँटीन, फूड प्रोसेसिंग युनिट्स, डेअरी उद्योग, कम्युनिटी किचन व स्थलांतरित कामगार सेवा या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आतापर्यंत २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वाटप करून सुमारे १५,८०० टन एलपीजी उचलण्यात आले आहे.

होर्मूझ मार्गातून टँकर्सचा प्रवास सुरू

जहाजवाहतूक मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी सांगितले की, ९२,००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन दोन टँकर्स सध्या होर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करत आहेत. हा मार्ग जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

पंतप्रधान मोदींचा जागतिक नेत्यांशी संपर्क

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांशी सतत संपर्कात आहेत.

अलीकडेच त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधत शांतता, स्थैर्य आणि सुरक्षित समुद्री मार्गांचे महत्त्व अधोरेखित केले.

परिस्थितीवर सरकारची नजर

केंद्र सरकारकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, पुढील आंतरमंत्रालयीन बैठकीत अधिक अद्ययावत माहिती दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai : मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा; आरोपी टिपू सुलतानला पश्चिम बंगालमधून अटक