नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच फटकारले. सैन्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होईल, असे पाऊल उचलण्यापूर्वी संवेदनशीलतेने विचार करावयास हवा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असून ही याचिका फेटाळली आहे.
न्या. सूर्य कांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, अशी याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागले पाहिजे. देशाप्रति प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची ही वेळ आहे. भारतीय नागरिकांचे किंवा सैन्याचे मनोबल खचेल, अशी कोणतीही याचिका करू नका. सदर प्रकरणाची संवेदनशीलता पाहा.
चौकशी करणे हे आमचे काम नाही!
फतेश कुमार शाहू, मोहम्मद जुनैद आणि विकी कुमार या वकिलांच्या गटाने पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. सदर याचिका फेटाळून लावत असताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच सुनावले. तसेच काही प्रश्नही विचारले. न्यायालयातील न्यायाधीश हे वादावर तोडगा काढण्याचा निर्णय देतात. चौकशी करणे हे आमचे काम नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.