सिंगापूर : अवघ्या १८ वर्षांतही जग जिंकता येते, हे दोम्माराजू गुकेशने दाखवून दिले. भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस गुकेशने संस्मरणीय ठरवला. भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश याने शेवटच्या आणि १४व्या डावात चीनचा जगज्जेता डिंग लिरेन याला धूळ चारत बुद्धिबळाच्या पटावर सर्वात युवा जगज्जेता होण्याचा मान पटकावला. रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह (२२व्या वर्षी) यांचा गेल्या १४ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढत गुकेशने नव्या अध्यायाची नोंद केली. विश्वनाथन आनंद याच्यानंतर जगज्जेता होण्याचा मान पटकावणारा गुकेश हा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला.
जवळपास ४ तास रंगलेल्या १४व्या फेरीत डिंग लिरेनला ५८ चालींमध्ये पराभूत होण्यात भाग पाडणारा गुकेश हा जगातील एकूण १८वा जगज्जेता ठरला आहे. लिरेनने १३८ वर्षांच्या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या इतिहासात केलेली सर्वात मोठी घोडचूक गुकेशच्या पथ्यावर पडली. १४वा डाव बरोबरीत सुटला असता, तर शुक्रवारपासून टाय-ब्रेकद्वारे सामन्याचा निकाल लागला असता. मात्र गुकेशने ७.५-६.५ अशा फरकाने विजय मिळवत जगज्जेतेपदाला गवसणी घातली. गुकेशला जगज्जेतेपदासह १.३ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वयाच्या ५५व्या वर्षी बुद्धिबळात सक्रिय नसलेल्या विश्वनाथ आनंदचा गुकेशला घडवण्यात मोलाचा हातभार लागला आहे.
पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना लिरेनने डावाची सुरुवात आश्वासक केली. गुकेशने डावाच्या मध्यात आपली पटावरील स्थिती मजबूत केली होती. त्यामुळे ही लढत बरोबरीत सुटेल, अशी आशा असतानाचलिरेनने १९व्या चालीत मोठी चूक केली आणि त्याचा फायदा उठवत गुकेशने लिरेनला चेकमेट केले.
जगज्जेतेपदाची ही लढत गुकेश १२व्या फेरीआधीच सहज जिंकेल, असे भाकीत अनेक बुद्धिबळपंडितांनी वर्तवले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून मोजक्याच स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या चीनच्या डिंग लिरेनच्या ताकदीचा अंदाज फारसा कुणालाही नव्हता. त्यातच पहिल्याच फेरीत लिरेनने गुकेशला पराभूत करत आपली हुकूमत सिद्ध केली होती. पण गुकेशने लगेचच हार न मानता तिसऱ्या फेरीत लिरेनला जशास तसे प्रत्युत्तर देत पराभवाचा बदला घेतला होता. सलग सात डाव बरोबरीत सोडवल्यानंतर गुकेशने ११व्या डावात विजय मिळवत आघाडी घेतली होती. पण लिरेनने जोमाने मुसंडी मारत १२वा डाव जिंकत सामन्यात बरोबरी साधली होती. अखेरच्या डावाला सुरुवात होण्याआधी ६.५-६.५ अशी बरोबरी असताना, पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या लिरेनने केलेली घोडचूक गुकेशच्या पथ्यावर पडली आणि प्रतिस्पर्ध्याला ‘चेकमेट’ देत गुकेशने पहिल्याच प्रयत्नांत जगज्जेतेपदावर नाव कोरले.
गुकेशची अभूतपूर्व झेप
बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर (१२ वर्षे)
२०२२ साली चेस ऑलिम्पियाडचे एकेरीचे जेतेपद
२०१८ मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
२७५० एलो रेटिंग गुण मिळवणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू
आव्हानवीर (कँडिडेट्स) बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू
बुद्धिबळातील सर्वात युवा चॅम्पियन
पंतप्रधानांकडून शुभेच्छांचा वर्षाव
विश्वनाथन आनंद याच्यानंतर भारताचा दुसरा जगज्जेता ठरलेल्या चेन्नईच्या डी. गुकेशचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. “ऐतिहासिक आणि अनुकरणीय. उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुकेशचे अभिनंदन. अतुलनीय प्रतिभा, खडतर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावरच गुकेशला हे यश संपादन करता आले,” असे मोदींनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.
लिरेनची चूक समजलीच नाही - गुकेश
डिंग लिरेन याने हत्तीची चाल रचून केलेली घोडचूक समजायला मला वेळ लागला. प्रतिस्पर्ध्याचा उंट माझ्या जाळ्यात सहज सापडला आहे, हे समजायला मला काहीसा अवधी लागला. जेव्हा त्याची ही चूक माझ्या लक्षात आली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, असे विजयानंतर गुकेशने सांगितले.