‘जंतरमंतर’ आंदोलनासाठी बंद; याचिकेवर आज सुनावणी 
राष्ट्रीय

‘जंतरमंतर’ आंदोलनासाठी बंद; याचिकेवर आज सुनावणी

अनेक राजकीय आंदोलनांचे साक्षीदार असलेले दिल्लीतील जंतरमंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण दिल्ली पोलिसांनी आता यादीतून वगळले असून, राजधानीत आंदोलन करण्यासाठी तीन पर्यायी ठिकाणे जाहीर केली आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : अनेक राजकीय आंदोलनांचे साक्षीदार असलेले दिल्लीतील जंतरमंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण दिल्ली पोलिसांनी आता यादीतून वगळले असून, राजधानीत आंदोलन करण्यासाठी तीन पर्यायी ठिकाणे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता जंतरमंतरवर धरणे किंवा आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. गृह मंत्रालयाच्या एका अधिकृत आदेशानुसार, आंदोलनासाठी तीन नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

मागील काही महिन्यांत झालेल्या सलग आंदोलनांमुळे सरकारी यंत्रणांचे केंद्र असलेल्या नवी दिल्ली जिल्ह्यात वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी ११ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, आता आंदोलने आणि निदर्शनांसाठी रामलीला मैदान, बुराडी ग्राउंड आणि सीबीडी ग्राउंड (पूर्व दिल्ली) या तीन नवीन जागांची घोषणा करण्यात आली आहे.

बंदीविरोधात याचिका; आज सुनावणी

दिल्लीतील जंतरमंतर हे निदर्शनांसाठी बंद करण्यात आल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने तयारी दर्शवली असून मंगळवारी सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. सोमवारी एका वकिलाने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन वासुदेव सांबरे आणि न्या. संजय शर्मा यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला. प्राधिकरणाने निदर्शनांसाठी कोणतीही पर्यायी जागा निश्चित न केल्यामुळे शांततापूर्ण आंदोलनांची गळचेपी होत असल्याचे वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याचबरोबर, गेल्या आठवड्यात झालेल्या निदर्शनांदरम्यान काही 'बाह्य लोकांनी' प्रवेश करून आंदोलकांना त्रास दिल्याचा आरोप करणाऱ्या दुसऱ्या याचिकेवरही मंगळवारी सुनावणी होणार आहे.

जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी तारीख मिळवण्यासाठी सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी सोमवारी संसद मार्ग पोलीस ठाण्यात भेट दिली. आम्ही पोलिसांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला असून, तोपर्यंत परवानगी न मिळाल्यास आंदोलनाची पुढील घोषणा केली जाईल, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. आम्ही जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे तारीख मागणार आहोत. पोलीस आम्हाला तारीख देतील अशी आम्हाला आशा आहे. जर त्यांनी तारीख दिली नाही, तर आम्ही २४ तासांच्या आत पुढील निर्णय जाहीर करू, असे रांका म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अखेर विवेक भीमनवार रजेवर; पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनाला यश, सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची घोषणा

सर्वोच्च न्यायालयावर विरोधकांचा ‘मार्च’; मतचोरी, SIR प्रक्रियेविरोधात संयुक्त याचिका दाखल

संपूर्ण देशच बनेल जंतरमंतर - अभिजीत दिपके

Mumbai : शिवाजी पार्कवर मूक आंदोलन; निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र आक्षेप

अभिनेत्री मधु कांबीकर यांचे पुण्यात निधन; मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी, रंगभूमीच्या क्षेत्रावर शोककळा