कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेल्याने मेस्सीच्या चाहत्यांचा उद्रेक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा माफीनामा, म्हणाल्या... 
राष्ट्रीय

कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेल्याने मेस्सीच्या चाहत्यांचा उद्रेक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा माफीनामा, म्हणाल्या...

लिओनेल मेस्सीच्या GOAT Tour India अंतर्गत कोलकात्यातील कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. चाहत्यांच्या संतापानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागत चौकशी समिती जाहीर केली.

किशोरी घायवट-उबाळे

लिओनेल मेस्सीच्या GOAT Tour India अंतर्गत कोलकात्यातील कार्यक्रमात शनिवारी (दि.१३) मोठा गोंधळ उडाला. सॉल्ट लेक स्टेडियमवर मेस्सी अपेक्षेपेक्षा लवकर निघून गेल्यानंतर संतप्त चाहत्यांनी बाटल्या फेकल्या आणि काही ठिकाणी तोडफोडही केली. या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिओनेल मेस्सी आणि चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे."या दुर्दैवी घटनेबद्दल लिओनेल मेस्सी तसेच सर्व क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांची मी मनापासून माफी मागते.” असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी या घटनेप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे.

मेस्सी कार्यक्रमस्थळावर अल्प वेळासाठी उपस्थित राहून निघून गेल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. आयोजकांच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला आहे. संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये गोंधळ घातल्याने सुरक्षा यंत्रणांनाही मोठी कसरत करावी लागली.

ममता बॅनर्जी यांची जाहीर माफी

या घटनेबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होतांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सॉल्ट लेक स्टेडियमवर आज जे गैरव्यवस्थापन पाहायला मिळाले, त्याने मी अत्यंत व्यथित आणि धक्क्यात आहे. मी स्वतः हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमकडे जात होते. या दुर्दैवी घटनेबद्दल लिओनेल मेस्सी तसेच सर्व क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांची मी मनापासून माफी मागते.”

चौकशी समिती स्थापन

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी निवृत्त न्यायमूर्ती आशीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीत मुख्य सचिव तसेच गृह व्यवहार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सदस्य म्हणून असतील. ही समिती घटनेची सविस्तर चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे.

भाजपकडून टीएमसीवर टीका

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाने (भाजप) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कार्यक्रमातील अराजक आणि गैरव्यवस्थापनासाठी राज्य सरकार आणि आयोजकांना जबाबदार धरत भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.

लिओनेल मेस्सीसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडापटूच्या दौऱ्यात अशी घटना घडणे ही राज्यासाठी नामुष्कीची बाब असल्याची भावना अनेक क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप