नवी दिल्ली : मुंबई-महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश अशा देशाच्या विविध भागात रविवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. हजारो भाविकांनी भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतले. देशाच्या विविध भागांतील भोलेनाथ यांच्या मंदिरामध्ये सुरू असलेल्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषामुळे वातावरणात एकच उत्साह संचारला होता. मुंबईच्या प्रसिद्ध बाबूलनाथ मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. हातात बेल, फुले घेऊन भाविक रांगेत उभे होते. अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात ‘बम बम भोले’चा जयघोष होत होता. शनिवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने रविवारी महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संभाजी नगर येथील ‘घृष्णेश्वर मंदिर’ येथे लाखो भाविक आले होते.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. देशातील १२वे ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात ४५० पोलीस कर्मचारी तैनात केले होते. गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरळीत दर्शनासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
एलोरा येथे लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते. हे मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहील. यंदा मंदिरापासून किमान एक किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मंदिर परिसरात ३२ अधिकारी, १७५ होमगार्ड आणि २५० पोलिस कर्मचारी तैनात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परळीत भाविकांची रीघ
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिर येथेही भाविकांची मोठी गर्दी झाली. बीड पोलिसांनी अधिकारी व होमगार्डसह सुमारे २५० कर्मचाऱ्यांची तैनाती केली असून, ही व्यवस्था सोमवार सकाळपर्यंत कायम राहणार आहे. येथे दर्शनासाठी भाविकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध औंढा नागनाथ मंदिर, जे आठवे ज्योतिर्लिंग मानले जाते, येथेही प्रशासनाने भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सायंकाळी मंदिर परिसरात ड्रोन शोचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
भगवान शिवाला अर्पण केलेला महाशिवरात्री हा देशभरात अत्यंत महत्त्वाचा सण असून, प्रार्थना, उपवास आणि रात्रभर चालणाऱ्या उपासनेद्वारे भाविक मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा करतात.
तमिळनाडूत पारंपरिक उत्साह
चेन्नई: तमिळनाडूभर रविवारी शैव पंथीय देवस्थानांमध्ये पारंपरिक भक्तिभावात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. चेन्नई, तंजावर आणि कोयंबतूर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी दिसून आली. येथील मायलापूरमधील ऐतिहासिक ‘कपालेश्वर मंदिर’ येथे आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि विद्यार्थ्यांसह विविध पार्श्वभूमीतील भाविकांनी दर्शनासाठी तासन्तास रांगा लावल्या. भेट देण्यासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाने वातावरणातील चैतन्याबद्दल उत्साह व्यक्त करत मंदिर भव्य असल्याचे सांगितले आणि भारतीय आध्यात्मिक परंपरा अनुभवण्याची ही संधी भाग्याची असल्याचे नमूद केले. “आम्ही तुमच्या भव्य मंदिरात नुकतेच पोहोचलो आहोत; आत जाऊन सर्व काही पाहण्याची आतुरता आहे,” असे तिने सांगितले.
तीर्थक्षेत्र रामेश्वरममध्ये हजारो भाविकांनी ‘रामनाथस्वामी मंदिर’ येथे दर्शनासाठी गर्दी केली. पारंपरिक विधीनंतर भाविकांनी ‘अग्नी तीर्थम’ येथे समुद्रस्नान केले आणि मंदिर परिसरातील २२ पवित्र विहिरींमध्ये स्नान करून ज्योतिर्लिंगाचे पूजन केले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रामनाथपुरम जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनारी होणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा व सुरक्षा यांची व्यापक व्यवस्था केली होती.
श्री काशी विश्वनाथला पवित्र वस्तूंचे अर्पण
वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिराला देश-विदेशातील ६२ मंदिरांकडून पवित्र वस्तू अर्पण करण्यात आल्या. पवित्र वस्त्रे, राज (धूळ) आणि तीर्थजल यांचा त्यात समावेश होता. श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्ड, उत्तराखंडमधील श्री केदारनाथ मंदिर, मुंबईतील लालबाग राजा व श्री सिद्धिविनायक मंदिर, गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर, राजस्थानमधील नाथद्वारा मंदिर तसेच श्रीलंकेतील लक्ष्मी मंदिर येथून या वस्तू आल्या होत्या.