नवी दिल्ली/इम्फाळ : मणिपूर सरकारने इम्फाळमधील पॅलेस मैदानातून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यास परवानगी नाकारली आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, त्यानंतर जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्यांनी ‘मर्यादित सहभागींसह’ काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यासाठी स्थळ मंजूर केले आहे. अर्थात काँग्रेसने ईशान्य राज्यातून यात्रा सुरू करण्याचा निर्धार केला आहे आणि शहरातील दुसऱ्या ठिकाणी परवानगी मागितली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि के.सी. वेणुगोपाल यांनी यात्रेवर एक पुस्तिका आणि वेबसाइट लॉन्च केली. वेणुगोपाल म्हणाले की, मणिपूर सरकारने इम्फाळच्या पॅलेस मैदानातून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यास परवानगी नाकारली आहे. मणिपूर येथून यात्रा सुरू करण्याचा काँग्रेसचा निर्धार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आणि पक्षाने इम्फाळमधील अन्य ठिकाणाहून पदयात्रा सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.
१४ जानेवारीपासून सुरू होणारी ही यात्रा ६७१३ किलोमीटरचा प्रवास करील. यात सहभागी व्यक्ती बस आणि पायी प्रवास करतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या यात्रेत ६६ दिवसांत ११० जिल्हे, १०० लोकसभेच्या जागा आणि ३३७ विधानसभा क्षेत्रांचा समावेश असेल. मणिपूर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष कीशम मेगाचंद्र म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांची भेट घेतली आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील हट्टा कांगजेबुंग येथे 'भारत जोरो न्याय यात्रे'साठी परवानगी मागितली, जिथून रॅलीला हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सचिवालयात ही भेट घेतली.
हे लोकांच्या हक्कांचे उल्लंघन
पक्षाने राज्य सरकारच्या निर्णयाला ‘लोकांच्या हक्कांचे उल्लंघन’ म्हणून संबोधले आणि सांगितले की प्रस्तावित यात्रा सुरू करण्यासाठी पर्यायी जागेचा विचार केला जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध नाही.