राष्ट्रीय

मोहन यादव मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री ओबीसी चेहरा देण्याची खेळी : भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेल्या यादव यांच्या नावावर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर सात दिवसांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा प्रश्न सुटला आहे. मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे, तर राज्याला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे.

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेल्या यादव यांच्या नावावर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना पाठिंबा आहे. उज्जैनमधून तीन वेळा निवडून आलेले यादव यांची निवड मुख्यमंत्रीपदी झाल्यावर शिवराजसिंह चौहान यांचे राजकारणातील स्थान कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे सुपूर्द केला.

विद्यार्थीदशेतून राजकारणाला यादव यांनी प्रारंभ केला. अ.भा.वि.प.मध्ये काम केल्यानंतर २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा निवडून आले. २ जुलै २०२० मध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे राजकारणातील स्थान भक्कम झाले. यंदाच्या निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२,९४१ मतांनी पराभव केला.

जबाबदारी योग्यरीत्या पार पाडेन

मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर मोहन यादव म्हणाले की, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबाबत धन्यवाद. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याने मी माझी जबाबदारी योग्यरीत्या निभावण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार