दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड (Delhi) समोर आले आणि संपूर्ण देश हादरला. मुंबईतील वसईमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरची हत्या तिच्या लिव्ह-एनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली आणि तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. आरोपी आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याची टीका भाजप नेते राम कदम यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर श्रद्धाच्या वडिलांनीदेखील ही शंका व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून आता घाटकोपरमध्ये काही महिलांनी रस्त्यावर उतरून आपलं रोष व्यक्त केला असून आरोपीचे पुतळे जाळले आहेत.
भाजप नेते राम कदम यांनी म्हंटले आहे की, "हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे का? वसईमधील तरुणी श्रद्धाच्या खुनाचा दिल्ली पोलिसांनी तपास करावा. तसेच आरोपी मृत तरुणीचे धर्म परिवर्तन करू इच्छित होता का, हेही तपासावे. श्रद्धाने धर्मांतरास नकार दिल्यामुळेच आरोपीने तिचा खून केला का? या सर्व बाबींची दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी." अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर श्रद्धाच्या वडिलांनी म्हंटले की, "मला हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याची शंका होती. आम्ही आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. माझा दिल्ली पोलिसांवर विश्वास आहे आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे. श्रद्धा तिच्या काकांच्या जवळ होती. माझ्याशी जास्त बोललो नाही. मी कधीच आफताबच्या संपर्कात नव्हतो. मी वसई, मुंबई येथे पहिली तक्रार नोंदवली."