राष्ट्रीय

मोदींचा मास्टरस्ट्रोक! नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न

एका वर्षात जास्तीत जास्त तिघांना भारतरत्न द्यावा, असा एक संकेत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी तिघांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. काँग्रेस नेते, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करत मास्टरस्ट्रोक मारला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाऊंटवर ही घोषणा केली. मोदी म्हणाले, “देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले.” माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नावाची घोषणा करताना मोदी म्हणाले, ‘‘नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभा सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला. देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.’’ पंतप्रधान या नात्याने नरसिंह राव यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे द्वार उघडले. ज्यामुळे आर्थिक विकासाचे एक नवे युग सुरू झाले. याशिवाय परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे भारत पुढे आला.

हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी आव्हानात्मक काळात भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका वठवली. भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट तर झालाच, पण त्याशिवाय देशाची अन्नाची गरज भागविली गेली आणि शेतीला समृद्धीही मिळाली. मी त्यांना अतिशय जवळून ओळखत होतो. मी नेहमीच त्यांचे सल्ले, सूचना यांना महत्त्व दिले.’’

एका वर्षात पाच भारतरत्न

एका वर्षात जास्तीत जास्त तिघांना भारतरत्न द्यावा, असा एक संकेत आहे. पण, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षात पाच जणांना भारतरत्न देऊन सन्मानित केले गेले आहे. याआधी जानेवारीत बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर, तर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकतेच भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे.

मोदींचा पुन्हा सस्पेंस ड्रामा

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून मध्यंतरी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा एक दिवस वाढवल्यानंतर भाजपने शुक्रवारी लोकसभा व राज्यसभेतील आपल्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे पुन्हा सस्पेंस वाढला आहे. शनिवारी सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा व राज्यसभेत काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून ते मंजूरही केले जाणार आहेत, असे कळते. त्यामुळे सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. लोकसभा व राज्यसभेतील भाजपच्या सर्व खासदारांना अपील केले जाते की, शनिवारी पूर्ण दिवस सभागृहात उपस्थित राहावे. सरकारच्या निर्णयाचे समर्थन करावे, अशा आशयाचा व्हीपवरील मजकूर आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले