राष्ट्रीय

नितीशकुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता

वृत्तसंस्था

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी भेट घेतली. नितीशकुमार यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर ते प्रथमच दिल्लीच्या दौऱ्यावर आले आहेत. नितीशकुमार यांची शरद पवार यांच्याशी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. या नेत्यांच्या भेटीमुळे भाजपला शह देण्यासाठी देशात नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. 

दिल्ली दौऱ्यावर आलेले नितीशकुमार यांनी शरद पवार यांच्याशिवाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी, कम्युनिस्ट पक्षांचे नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. नितीशकुमार यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षांकडे प्रभावी चेहरा नाही. मागील दोन लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यातच नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे विरोधक नितीशकुमार यांच्याकडे विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाहत आहेत. अर्थात, नितीशकुमार यांनी तशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नसली तरी नवी दिल्लीत त्यांनी विविध नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी त्याचेच संकेत देत आहेत. काँग्रेसची भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे. ते नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारतील का? हा खरा प्रश्न असणार आहे. यात मध्यस्थीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबतच्या नितीशकुमार भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

नितीशकुमार यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळणार?

बिगरभाजप शासित राज्यातील सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सध्या केंद्र सरकारशी पंगा घेताना दिसत आहेत. त्यांच्या कृतीतून नरेंद्र मोदी यांना विरोध हा एकमेव अजेंडा दिसत आहे. या मुख्यमंत्र्यांमधूनच एकाला २०२४ला मोदींविरोधात पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याची विरोधकांची खेळी आहे; मात्र अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि के. चंद्रशेखर यांच्या नावाला काँग्रेसकडून सहमती मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नाव चर्चेत आले आहे. कदाचित, नितीशकुमार यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकतो.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम