दिल्लीकरांना दिलासा! नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात  (Photo-X)
राष्ट्रीय

दिल्लीकरांना दिलासा! नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात

Noida International Airport : या विमानतळामुळे दिल्ली-एनसीआर परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार असून, या भागाच्या आर्थिक विकासालाही नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील जेवर येथे उभारलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Noida International Airport) सोमवारी (दि. १५) व्यावसायिक उड्डाण सेवांना अधिकृत सुरुवात झाली. लखनऊहून आलेल्या इंडिगोच्या विमानाने या विमानतळावर पहिले लँडिंग करत इतिहास रचला. उद्घाटन उड्डाणात विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या १७० शेतकऱ्यांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे, विमानतळासाठी जमीन देणारे १७० शेतकरी या पहिल्या विमानातील प्रवासी होते.

ग्रीनफिल्ड स्वरूपात उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्पासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. लखनऊच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आलेले इंडिगोचे विमान नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे पहिले व्यावसायिक विमान ठरले.

६ई-२२७८ या क्रमांकाचे विमान सकाळी विमानतळावर उतरले. त्याचे पारंपरिक वॉटर कॅनन सलामी देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर हेच विमान सकाळी ८.३५ वाजता बंगळुरूकडे रवाना होणार होते. या विमानाचे सकाळी ११.०५ वाजता बंगळुरूमध्ये पोहचले.

भूमीदान करणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान

विमानतळ प्रकल्पासाठी आपली वडिलोपार्जित जमीन स्वेच्छेने दिलेल्या जेवर परिसरातील सुमारे १७० शेतकरी उद्घाटन उड्डाणात सहभागी झाले होते. त्यामध्ये २० महिलांचाही समावेश होता. लखनऊ येथे पोहोचल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या शेतकऱ्यांचा सत्कार केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांचे योगदान अधोरेखित करत त्यांना "अन्नदाता" असे संबोधले. देशाच्या विकास यात्रेत शेतकरी केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.

केंद्रीय मंत्र्यांचा प्रवाशांशी संवाद

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी या कार्यक्रमादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला. तसेच उद्घाटन उड्डाणातील प्रवाशांना स्मृतिचिन्ह स्वरूपातील विशेष बोर्डिंग पासही वितरित केले.

'एरोट्रोपोलिस' म्हणून विकसित करण्याचा मानस

"नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ ट्रान्झिट हब किंवा वाहतूक केंद्र म्हणून नव्हे, तर एरोट्रोपोलिस म्हणून विकसित व्हावा, अशी आमची इच्छा आहे. या परिसरात विविध उद्योग उभे राहावेत आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा देणारा मजबूत आर्थिक पाया निर्माण व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे," असे राममोहन नायडू यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले होते.

उत्तर भारतासाठी महत्त्वाचे विमानवाहतूक आणि कार्गो केंद्र

जेवर येथे उभारण्यात आलेला हा विमानतळ दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आला आहे. याशिवाय, उत्तर भारतातील महत्त्वाचे विमानवाहतूक आणि कार्गो केंद्र म्हणूनही त्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, या भागाच्या आर्थिक विकासालाही नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आता येतेय IRCTC ची नवी वेबसाइट; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा, कधी होणार लाँच? जाणून घ्या सविस्तर

Thane : बेशिस्त पार्किंगला 'नो एन्ट्री'; वाहतूककोंडीवर नागरिक आणि पोलिसांचा संवाद

बदलापूरमधील 'सिग्नल' आता मराठीत; इंग्रजी शब्दांसह अंकांतही बदल

Mumbai : सागरी सुरक्षेला बळ; सागर रक्षक दलाच्या स्वयंसेवकांची संख्या पोहोचली ३ हजार १५६ वर

'टनल हूड' तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर; बुलेट ट्रेन प्रकल्पामधील पर्वतीय बोगद्यांसाठी उपयुक्त