राष्ट्रीय

विरोधकांविरोधात ईडी, प्राप्तिकर, सीबीआयला अतिसक्रिय राहण्याचे आदेश, भाजपवर राजदचा आरोप

ईडी, सीबीआयला राम मंदिराच्या उद्घाटनापर्यंत अतिसक्रिय होण्यास सांगितले, खासदार मनोजकुमार झा यांचा आरोप

Swapnil S

पाटणा : ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाला केंद्राने राम मंदिराच्या उद्घाटनापर्यंत भाजपला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात अतिसक्रिय होण्यास सांगितले आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार मनोजकुमार झा यांनी केला आहे. येथे ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. देशाचे भाजपने पोलीस राजवटीत रूपांतर केले असल्याचे दिसत आहे, असाही त्यांनी यावेळी आरोप केला.

मात्र या आरोपाचा भाजपने इन्कार केला आहे. सरकारी संस्था या स्वतंत्रपणे काम करीत असून जे कोणी भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत त्यांनाच या साऱ्यांची भीती वाटत असल्याचा दावा भाजपने केला आहे.

झा म्हणाले की, या एजन्सीमध्ये विविध पातळ्यांवर काही कर्तव्यदक्ष लोक आहेत. जे भाजपच्या हातात राजकीय साधन बनण्याच्या हुकुमावर खूश नाहीत, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. २२ जानेवारीपर्यंत अशा कारवाई कराव्यात. जेव्हा प्रसारमाध्यमांचे लक्ष अयोध्येकडे वळेल. या कालावधीत या ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागांनी बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये विशेषतः सक्रिय व्हावे असे त्यांना सांगण्यात आले आहे, असा दावाही झा यांनी केला.

भाजपच्या विरोधामध्ये असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, हेमंत सोरेन आणि एम. के. स्टॅलिन मंत्रिमंडळातील काही व्यक्तींचा समावेश आहे, असे झा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, राजद नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने जारी केलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर झा यांनी हा आरोप केला आहे.

ईडीने यादव यांना त्यांचे वडील आणि पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे रेल्वे मंत्री असतानाच्या काळातील जमीन घोटाळ्यात ५ जानेवारी रोजी दिल्लीत हजर राहण्यास सांगितले आहे. झा म्हणाले की, "आम्ही अशा कृत्यांना घाबरत नाही. ही भाजपच आहे, जी नेहमीच आपल्या विरोधकांना राजकीयदृष्ट्या अशा प्रकारांना सामोरे जावयास भाग पाडत असते. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता आणि तेव्हाही असाच अपमान आम्ही सहन करत होतो, असेही झा म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी