बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे' 
राष्ट्रीय

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

पंजाबमधील कपुरथला येथे बेपत्ता मुलगा मृत झाल्याचं समजून कुटुंबीयांनी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र काही दिवसांनी कारागृहातून आलेल्या फोनवर तो जिवंत असल्याचं समोर आलं.

Mayuri Gawade

पंजाबमधील कपुरथला येथे एका कुटुंबासोबत अविश्वसनीय प्रकार घडला. घरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लागत नसताना पोलिसांनी दाखवलेल्या जळालेल्या मृतदेहाची ओळख कुटुंबीयांनी आपल्या मुलगा रवी कुमार म्हणून पटवली आणि त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले. मुलगा गमावल्याच्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच काही दिवसांनी कपुरथला मध्यवर्ती कारागृहातून आलेल्या एका फोनने संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण दिलं. ज्या रवीचे अंत्यसंस्कार केले, तो प्रत्यक्षात जिवंत असून कारागृहात असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

५ ऑगस्टपासून बेपत्ता होता रवी

'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार, रवी कुमार ५ ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. वडील आणि भावाने नातेवाईक, मित्र तसेच इतर ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर ११ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी कपुरथला सिटी पोलीस ठाण्यात रवी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

जळालेल्या मृतदेहाला समजलं आपला मुलगा

दरम्यान, पोलिसांना एका तरुणाचा जळालेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी त्या मृतदेहाचे फोटो रवीच्या कुटुंबीयांना दाखवले. काही दिवसांनी कुटुंबीय आणि काही परिचितांनी मृतदेहाची ओळख रवी कुमार म्हणून पटवल्याचं सांगितलं. मुलाचा मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबीयांनी १३ ऑगस्ट रोजी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर धार्मिक विधीही पार पडल्याचं वृत्त आहे.

२ सप्टेंबरला आला अनपेक्षित फोन

कुटुंबाने रवी आता या जगात नाही, हे स्वीकारलं होतं. मात्र, २ सप्टेंबर रोजी कपुरथला सेंट्रल जेलमधून आलेल्या एका फोनने संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण दिलं. जेलमधील कर्मचाऱ्याने "रवी कुमार नावाचा व्यक्ती कारागृहात आहे," अशी माहिती कुटुंबीयांना दिली. हे ऐकताच त्यांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही.

दुसऱ्या दिवशी कुटुंबीय थेट जेलमध्ये

फोन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबीय कपुरथला सेंट्रल जेलमध्ये पोहोचले. तिथे रवी कुमारला जिवंत पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्याचा मृत्यू झाल्याचं मानून अंत्यसंस्कार केले होते, तोच मुलगा समोर जिवंत असल्याने कुटुंबासाठी हा मोठा धक्का आणि तितकाच दिलासा देणारा क्षण ठरला.

रवी जेलमध्ये कसा पोहोचला?

मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर पोलिसांनी रवी कुमारला सुमारे महिनाभर आधी एका भटकंतीसंबंधित प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याला कपुरथला सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याच्या अटकेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली नव्हती.

या प्रकरणामुळे आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुटुंबीयांनी ज्या मृतदेहाला रवी समजून अंत्यसंस्कार केले, तो मृतदेह नेमका कोणाचा होता? तसेच रवीची ओळख आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क यामध्ये नेमकी कुठे चूक झाली, हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू