काळीज पिळवटून टाकणारी घटना! लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू; भावांनी केली बहिणीची पाठवणी (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
राष्ट्रीय

काळीज पिळवटून टाकणारी घटना! लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू; भावांनी केली बहिणीची पाठवणी

दुसऱ्याच दिवशी प्रियांकाचा विवाह होणार होता. अशा परिस्थितीत बहिणीला वडिलांच्या निधनाची बातमी सांगितल्यास तिला मोठा मानसिक धक्का बसू शकतो आणि लग्नावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती दोन्ही भावांना होती.

किशोरी घायवट-उबाळे

राजस्थान : लेकीच्या लग्नाचा आनंद, घरात सुरू असलेली लगबग आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत रंगलेला जल्लोष... पण या आनंदाला अचानक दुःखाची किनार लागली. लेकीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात नातेवाईकांसोबत नाचताना ५१ वर्षीय वडिलांच्या छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात नेत असताना त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्याच दिवशी मुलीचे लग्न असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, बहिणीच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून दोन्ही भावांनी वडिलांच्या निधनाची बातमी तिच्यापासून लपवली. आधी बहिणीची पाठवणी केली आणि त्यानंतर वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.

लग्नाच्या आनंदात काळीज पिळवटून टाकणारी घटना

ही घटना उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव उपविभागातील पाटियार (भूधर) गावात घडली. शंकरलाल मेघवाल (वय ५१) हे अहमदाबादमधील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुले असून, मोठी मुलगी प्रियांका हिचा विवाह २१ नोव्हेंबर रोजी निश्चित झाला होता.

लग्नाच्या तयारीचा भाग म्हणून २० नोव्हेंबर रोजी रात्री बिंदोरी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शंकरलाल नातेवाईकांसोबत आनंदाने नाचत होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर सुमारे तासाभराने त्यांच्या छातीत दुखू लागले. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले.

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी केले मृत घोषित

शंकरलाल यांना प्रथम ऋषभदेव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी उदयपूरच्या एमबी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लेकीच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला.

वडिलांच्या निधनाची बातमी भावांनी ठेवली लपवून

शंकरलाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. दुसऱ्याच दिवशी प्रियांकाचा विवाह होणार होता. अशा परिस्थितीत बहिणीला वडिलांच्या निधनाची बातमी सांगितल्यास तिला मोठा मानसिक धक्का बसू शकतो आणि लग्नावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती दोन्ही भावांना होती.

त्यामुळे त्यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी केवळ बहिणीपासूनच नव्हे, तर कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाइकांपासूनही लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला. या दुःखद प्रसंगाची माहिती केवळ शंकरलाल यांच्या दोन्ही मुलांनाच होती. बहिणीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस दुःखात जाऊ नये, यासाठी दोघांनीही मनातील दुःख कोणालाही जाणवू दिले नाही.

पहाटे तीन वाजेपर्यंत पार पडले लग्नाचे विधी

दरम्यान, समाजातील दोन व्यक्तींनी वरपक्षाशी संपर्क साधून शंकरलाल यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानंतर वर आपल्या १५ ते २० नातेवाइकांसह चनावडा गावातून पाटियार येथे पोहोचला. या दोन्ही गावांमधील अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे.

दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून ठरलेल्या वेळेची वाट न पाहता त्याच रात्री विवाहाचे विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अत्यंत साधेपणाने लग्नसोहळा पार पडला. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे तीन वाजेपर्यंत विवाहाचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले.

बहिणीची पाठवणी झाल्यानंतर भावांनी सांगितले सत्य

शंकरलाल यांच्या निधनाची बातमी प्रियांका आणि तिच्या आईपासून लपवण्यासाठी मुलाने वडील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल असून, त्यांना बोलता येत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे वडिलांचे निधन झाल्याची कल्पनाही प्रियांकाला नव्हती.

लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर प्रियांकाची पाठवणी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही भावांनी कुटुंबातील इतर सदस्यांना वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. या घटनेनंतर २१ नोव्हेंबर रोजी शंकरलाल मेघवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बहिणीच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये आणि तिच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस दुःखद आठवणीत बदलू नये, यासाठी दोन्ही भावांनी वडिलांच्या निधनाचे दुःख मनातच ठेवले. या हृदयद्रावक घटनेने पाटियार गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा एकावर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; सपासप वार करून हल्लेखोर फरार

पाणी कपातीतून आठवड्याचा दिलासा! एमआयडीसीचा २७ नोव्हेंबरचे नियोजित शटडाऊन रद्द

'तुझ्यासोबत माझाही नवा जन्म झाला'; लेकाच्या वाढदिवशी जिनिलीयाची भावुक पोस्ट, रितेशकडूनही रियानला खास शुभेच्छा

Naigaon : आईच्या निधनाचं दुःख ताजं असतानाच आणखी एक आघात; खेळताना ११ व्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

Thane : रिक्षा बंदवरून संघटनांमध्येच जुंपली; एकाचा बेमुदत बंदचा इशारा, दुसऱ्याचा मात्र संपाला विरोध