नवी दिल्ली : भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून सोमवारी न्या. संजीव खन्ना यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. खन्ना यांना पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी न्या. खन्ना यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी मान्यवर हजर होते. न्या. खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून १३ मे २०२५ रोजी त्यांची मुदत संपुष्टात येणार आहे. न्या. खन्ना हे जानेवारी २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. न्या. खन्ना यांचा जन्म दिल्लीस्थित कुटुंबात झाला असून त्यांचे वडील न्या. देवराज खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.