राष्ट्रीय

‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा अरुणाचल प्रदेशपासून महाराष्ट्रात होणार सांगता

नव्या नाऱ्याचे पडसादही नव्या टप्प्यात पाहण्यास मिळतील

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी दक्षिणोत्तर भारत जोडो यात्रा केल्यानंतर आता या यात्रेचा पूर्व-पश्चिम दुसरा टप्पा सुरू होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात अरुणाचल प्रदेशपासून होईल, तर या यात्रेचा शेवट महाराष्ट्रात होणार आहे. मुंबई काँग्रेसने याबाबत एक्सवर माहिती दिली आहे.

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत फायदा झाला होता. शिवाय विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण झाल्याने २७ विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीही स्थापन झाली आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पूर्वात्तर राज्यांतून सुरू होत आहे. मधल्या काळात मणिपूरमध्ये हिंसाचार घडला. शिवाय पुढील आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे. यामध्ये कोणती विधेयके मांडली जाणार, हे गुलदस्त्यात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी कोणती भूमिका घेऊन यात्रा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विरोधकांच्या आघाडीला इंडिया हे नाव दिल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती ‘इंडिया’ नाव जाऊन ‘भारत’ हे नाव येण्याची. अशात काँग्रेसने ‘जुडेगा भारत जितेगा इंडिया’ हा नारा दिला आहे. या नव्या नाऱ्याचे पडसादही नव्या टप्प्यात पाहण्यास मिळतील.

राज्यात काँग्रेस नेत्यांची पदयात्रा

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘‘राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत. पूर्व विदर्भात माझ्या नेतृत्वात पदयात्रा काढली जाणार आहे, तर पश्चिम विदर्भात आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रा काढणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे. कोकणातील पदयात्रेत आमच्या पक्षाचे सर्वच नेते सहभागी होतील.’’

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती