बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO X
राष्ट्रीय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

काही विद्यार्थ्यांनी जेवणात मीठ कमी असल्याची तक्रार केली. शाळेच्या स्वयंपाकघरात मीठ आणि डिटर्जंटचे डबे एकाच ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून मिठाऐवजी चुकून डिटर्जंट टाकलं गेलं...

Mayuri Gawade

बिहार : शाळेतील मध्यान्ह भोजनात (मिड-डे मील) मीठ कमी असल्याची तक्रार केली असता चक्क मिठाऐवजी चुकून डिटर्जंट टाकण्यात आल्याचा संतापजनक प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे. नूरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्य विद्यालय परासी येथे मंगळवारी (दि. १८) सोयाबीन-भात खाल्ल्यानंतर २४ हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना बिहारशरीफ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिठाऐवजी चुकून टाकलं डिटर्जंट

शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, मिड-डे मील जवळच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत पुरवलं जातं. मंगळवारी विद्यार्थ्यांना सोयाबीन-भात देण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांनी जेवणात मीठ कमी असल्याची तक्रार केली. त्यानंतर स्वयंपाकघरातून मीठ आणून जेवणात टाकण्यात आले. मात्र, स्वयंपाकघरात मीठ आणि डिटर्जंटचे डबे एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून मिठाऐवजी चुकून डिटर्जंट टाकलं गेल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं.

जेवणानंतर उलट्या अन् चक्कर

जेवण केल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागलं. अनेकांना उलट्या आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. शाळेत प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रकृती सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांना बिहारशरीफ सदर रुग्णालयात नेण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल सर्जन डॉ. जयप्रकाश सिंह यांनी रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांची पाहणी केली. सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं.

रुग्णालयात पालकांचा संताप

मुलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पालक रुग्णालयात पोहोचले. अचानक मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाल्याने एका बेडवर दोन-तीन मुलांवर उपचार सुरू असल्याचं पाहून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप करत त्यांनी गदारोळ केला. यानंतर सिव्हिल सर्जन यांनी पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना योग्य उपचार दिले जातील, असं आश्वासन दिलं. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.

रुग्णवाहिका न आल्याने ई-रिक्षातून विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेले?

या घटनेनंतर स्थानिक आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आली होती. मात्र, शाळेत रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय पथक पोहोचलं नसल्याचा आरोप पालकांनी केला. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने काही विद्यार्थ्यांना ई-रिक्षा आणि ऑटोमधून सदर रुग्णालयात नेण्यात आलं.

मीठ आणि डिटर्जंटचे डबे एकाच ठिकाणी का ठेवण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत का पोहोचली नाही, या मुद्द्यांवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पुढील चौकशी आणि कारवाईबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा