तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावरुन देशभरात बराच गदारोळ माजला होता. अनेकांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याची पाठराखण केली तर काहींनी त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. आता सनातनधर्माबाबतच्या वादाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. कोर्टाने तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस पाठवली आहे.
काय म्हणाले होते उदयनिधी?
तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, सनातन धर्म डेंग्यू-मलेरियासारखा आहे. त्याच्यावर उपचार करुन उपयोग झाला नाही. त्याला नष्टचं केलं पाहिजे. सनातन धर्म हा विषमतावादी धर्म आहे. त्याचा समाजाला काही उपयोग नाही. स्टॅलिन यांनी केलेल्या या विधानावरुन देशभरात गदारोळ माजला होता.
स्टॅलिन यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. भारतीय जनता पक्षाकडून देखील त्यांच्यावर निशाणा साधला गेला होता. स्टॅलिन यांचे हे विधान म्हणजे त्यांनी सनातन धर्माला मानणाऱ्या हिंदूचा नरसंहार करण्याचं केलेलं आवाहन आहे. अशी टीका भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली होती.
त्यांच्या या वक्तव्यावर भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. मिरा रोड पोलीस ठाण्यात स्टॅलिन यांच्याविरोधात गु्न्हा देखील दाखल झाला होता.