नवी मुंबई

सहा भाडोत्रींकडून उकळले तब्बल ६० लाख रुपये

या दाम्पत्याने यातील एकालाही घराचा ताबा अथवा त्यांची रक्कम त्यांना परत केलेली नाही

वृत्तसंस्था

वाशी परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या मालकीचे वाशी सेक्टर-१५ मधील बी-२/१२हा एकच फ्लॅट सहा वेगवेगळ्या व्यक्तींना हेवी डिपॉझीटवर भाडयाने देऊन त्यांच्याकडून तब्बल ६० लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या दाम्पत्याने यातील एकालाही घराचा ताबा अथवा त्यांची रक्कम त्यांना परत केलेली नाही. वाशी पोलिसांनी देखील या दाम्पत्यावर कोणतीही कारवाई न केल्याने हिंद मजदूर किसान पंचायतने थेट पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याकडे या दाम्पत्याबाबत तक्रार करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात भाडोत्रींची फसवणूक करणारा मोहम्मद सलिम व त्याची पत्नी नसरीन शेख या दाम्पत्याचे वाशी सेक्टर-१५ मध्ये बी-२/१२ हा फ्लॅट आहे. हाच फ्लॅट हेवी डिपॉझीटवर भाडयाने देण्याच्या बहाण्याने या दाम्पत्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहे. त्यापैकीच एक असलेल्या सपना बाबुशंकर पाल यांनी गत जून महिन्यात या दाम्पत्याचे घर हेवी डिपॉझीटवर घेण्यासाठी या दाम्पत्याला १५ लाख रुपये देऊन ३६ महिन्याचा कारार केला. मात्र, प्रत्यक्षात घर ताब्यात घेण्यास गेल्यानंतर त्या घरात मोरे नावाचा व्यक्ती राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराचा ताबा घेतलेल्या मोरे याच्याकडून मोहम्मद सलीम याने १४ लाख रुपये घेऊन हेवी डिपॉझीटवर सदरचे घर भाडयाने घेतल्याचे मोरे याचे म्हणणे आहे.

पाल यांच्या प्रमाणेच सुदालय कोणार यांनी देखील एप्रिल २०१९ मध्ये सदरचे घर एक वर्षासाठी हेवी डिपॉझीटवर भाडयाने घेऊन मोहम्मद सलीम व त्याच्या पत्नीला १० लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे फातिमा मुन्ना शेख यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये सदरचे घर भाडयाने घेण्यासाठी या दाम्पत्याला ४ लाख रुपये हेवी डिपॉझीटची रक्कम दिली. चांद मोहम्मद मोमीन या अपंग व्यक्तीने सप्टेंबर २०२१ मध्ये वडिलोपर्जीत घर विकून १४ लाख रुपये या दाम्पत्याला देऊन हेवी डिपॉझीटवर त्यांचे घर भाडयाने घेण्याचा प्रयत्न केला. तसेच साजिदा इकराम खाकरा यांनी देखील एप्रिल २०१८ मध्ये या दाम्पत्याला ५ लाख हेवी डिपॉझीट दिले. तसेच अफरोज इनतेखाब खान या विधवा महिलेने पतीच्या मृत्यूनंतर या दाम्पत्याला ९ लाख रुपये देऊन भाडयाने घर घेण्याचा प्रयत्न केला.

वाशी पोलिसांकडे या भाडोत्रींनी लेखी तक्रारी देखील केल्या. मात्र या दाम्पत्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे हिंद मजदूर किसान पंचायतचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी सांगितले.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर; कोणत्या जिल्ह्यात कोण अव्वल?

निवडणुकांच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "हा तर महापालिका निवडणुकांचा ट्रेलर...

"घरात बसून राहणाऱ्यांना..." ; निवडणुकांच्या निकालावर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

"तेच मशीन, तीच सेटिंग अन् तोच पैसा..." निवडणुकांच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया