नवी मुंबई

कुरुंदकरला जन्मठेप; अखेर नऊ वर्षांनंतर अश्विनी बिद्रे यांना मिळाला न्याय, अन्य दोन सहकाऱ्यांना ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या पापाचा घडा अखेर भरला.

Swapnil S

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या पापाचा घडा अखेर भरला. अश्विनी यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे लाकडे कापण्याच्या करवतीने लहानलहान तुकडे करून ते खाडीत फेकणाऱ्या कुरुंदकरला पनवेल जिल्हा न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा ठपका कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर ठेवून त्यांना ७ वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.

कुरुंदकर याला वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलीस दलातील अनेकांनी जीवाचा आटापिटा केला होता. परिणामी, अश्विनी यांच्या नातेवाईकांना न्यायासाठी गेली नऊ वर्षे संघर्ष करावा लागला. मात्र, याच संघर्षाला सोमवारी अखेर यश मिळाले. पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी या खटल्यात एका आरोपीची निर्दोष मुक्तता करून अन्य तिघांना शिक्षा ठोठावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर याने प्रेम प्रकरणातून सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची मीरारोड येथील आपल्या राहत्या घरी ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री हत्या केली. त्यानंतर त्याने आणि त्याचे सहकारी कुंदन भंडारी व महेश फळणीकर यांनी अश्विनी यांच्या मृतदेहाचे लाकडे कापण्याच्या कटरने लहान लहान तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी हे सर्व तुकडे गोणीत भरून वसई खाडीत फेकून दिले गेले. मृतदेह भरलेल्या या गोणी पाण्यावर तरंगू नये, यासाठी त्यांना जड वजने बांधण्यात आली होती. हा गुन्हा करताना कोणताही पुरावा आरोपींनी पाठीमागे ठेवला नव्हता. मात्र पोलीस दलात ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी सर्व तांत्रिक पुरावे जमा केले आणि कुरूंदकर गजाआड झाला. २०१९ पासून हा खटला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी चालवला. त्यांनी या खटल्यातून बाहेर पडावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही. त्यांचे मानधन लटकवून ठेवण्यात आले. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरत यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे अभय कुरूंदकरसह अन्य दोन आरोपींवर आरोप सिद्ध झाले.

अटकेपासूनचा कालावधी शिक्षेसाठी ग्राह्य धरणार

कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. ही शिक्षा त्यांच्या अटकेच्या दिवसांपासून ग्राह्य धरली जाणार आहे. हे दोन्ही आरोपी २० आणि २६ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक झालेले आहेत. तेव्हापासून ते कारागृहातच आहेत. त्यामुळे त्यांची शिक्षा पूर्ण झाली असल्याचे अतिरिक्त न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी स्पष्ट केले.

कुरुंदकरला इतर कलमासाठी झालेली शिक्षा

आरोपी अभय कुरुंदकरला ३०२ हत्येच्या गुन्ह्यात तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी देखील दोषी ठरवण्यात आले असून त्यात त्याला ७ वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कलम ३६४ नुसार (अपहरण) १० वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच ३२३ कलमानुसार मारहाण करण्यासाठी १ वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच ५०६(२) धमकी देणे या गुन्ह्यात ७ वर्षे शिक्षा आणि १० हजाराचा दंड तसेच कलम ४१७ फसवणूक प्रकरणात १ वर्षे शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड, त्याचप्रमाणे कलम ४६५ बनावटगिरी केल्याप्रकरणी २ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड, त्याचप्रमाणे कलम ४६८ साठी ७ वर्षे आणि १० हजार रुपये दंड, कलम ४७१ साठी २ वर्षे शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड, कलम २१८ साठी ३ वर्षे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. आरोपी अभय कुरुंदकर हा ७ डिसेंबर २०१७ ते २१ एप्रिल २०२५ या ७ वर्षे ४ महिन्याच्या कालावधीत जेलमध्ये राहिल्याने त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेतून ४२८ नुसार त्याला सवलत मिळू शकते.

कुरुंदकरला मदत करणाऱ्यांवर टांगती तलवार

या हत्याकांडप्रकरणी आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपेरे, सहाय्यक आयुक्त निलेवाड, नितीन राऊत, उपायुक्त तुषार दोषी यांच्या चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा