नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडात दोषी ठरलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलासह अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी न्यायालयात केली, तर आरोपीच्या वकिलाने दया दाखवत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यामुळे न्या. के. जी. पालदेवार यांनी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे तसेच दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या हत्या प्रकरणातील आरोपींना येत्या २१ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुरुंदकरला फाशी होणार की जन्मठेप याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अश्विनी बिद्रे यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट करणारा या हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला तसेच या कामात कुरुंदकरला मदत करणारे कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या तिघांना न्या. के. जी. पालदेवार यांनी गेल्या सुनावणीच्या वेळी दोषी ठरवले होते. त्यानंतर न्या. पालदेवार यांनी अश्विनी बिद्रे यांची मुलगी व अश्विनीचे वडील, भाऊ, पती तसेच दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपींना शिक्षा ठोठावणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात अश्विनी यांची मुलगी, वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे व पती राजू गोरे उपस्थित होते. यावेळी बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी कुरुंदकर याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. तसेच सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनीदेखील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाला केली, तर आरोपीचे वकील भानुशाली यांनी मात्र आरोपीला दया दाखवून त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. यावेळी न्या. पालदेवार यांनी बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांचे म्हणणे तसेच दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यावर सर्वंकष विचार करून येत्या २१ एप्रिल रोजी यावर निकाल देणार असल्याचे जाहीर केले.
हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी
अश्विनी बिद्रे हत्येच्या तपासात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा व हलर्गजीपणा केला. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बिद्रे कुटुंबीयांचे वकील ॲॅड. प्रदीप घरत यांनी केली. तसेच आरोपी अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी पाठवून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या पदकासाठी शिफारस करणाऱ्या कमिटीवरही कारवाई करण्याची मागणी ॲॅड. घरत यांनी न्यायालयाकडे केली.
...अन् लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला!
अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिद्रे यांनी केलेल्या संघर्षाची अश्विनी यांची कन्या सुची गोरे ही साक्षीदार आहे. नऊ वर्षांपूर्वी आजच्या तारखेलाच कुरुंदकरने अश्विनी यांची हत्या केली होती. ज्या दिवशी आईची हत्या झाली, त्याच तारखेला न्यायालयात प्रवेश केल्यानंतर सुचीच्या अश्रूंचा बांध फुटला. आईच्या आठवणीने तिने हंबरडा फोडला. त्यामुळे गर्दीने भरलेले न्यायालय एकदम स्तब्ध झाले. आईकडे पाहून मला पोलीस व्हायचे होते. मात्र, आई पोलीस अधिकारी असूनही तिची हत्या झाली. तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळे पोलीस दलावरचा विश्वास उडाला आहे, अशी नाराजी यावेळी सुचीने व्यक्त केली.