नवी मुंबई

घरफोड्या करणारा सराईत चोर ३६ तासांत पोलिसांच्या जाळ्यात ; १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रबाळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास घरफोडी करणाऱ्या अंकुश उत्तम ढगे (३९) या सराईत चोरट्याला ३६ तासांत अटक करून त्याने रबाळे व आजूबाजूच्या हद्दीत केलेले १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास घरफोडी करणाऱ्या अंकुश उत्तम ढगे (३९) या सराईत चोरट्याला ३६ तासांत अटक करून त्याने रबाळे व आजूबाजूच्या हद्दीत केलेले १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच या गुन्ह्यातील तब्बल १२ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.

घणसोलीतील संजय हाइट्स इमारतीत राहणारे रघुनाथ शेलार (४३) हे गत गत ९ मार्च रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या नातेवाईकास भेटण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास बंद असलेल्या त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून, कपाटातील लॉकर उचकटून त्यातील २ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते.

यावेळी सदर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अंकुश ढगे हा घणसोली गावातील जिजामाता नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे स्क्रू-ड्रायव्हर व एका लोखंडी स्क्रू पान्यासह शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने घणसोली परिसरात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास घरफोड्या करून सोने-चांदीचे दागिने चोरल्याचे व त्यातून मिळालेली रक्कम त्याच्या उदरनिर्वाहासाठी व मौजमजेसाठी खर्च केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ घरफोड्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

"रबाळे पोलिसांनी अटक केलेला सराईत चोरटा अंकुश उत्तम ढगे याने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १२ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यातील १२ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे दागिने व ५०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीविरोधात यापूर्वी कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११, रबाळे एमआयडीसी, आझाद नगर पोलीस ठाणे, कोन गाव पोलीस ठाणे तसेच एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी-१ असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत." - पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश