नवी मुंबई

कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार; भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर

एक्स्प्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाइन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार.

Swapnil S

उरण : एक्स्प्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाइन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बुधवारी कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या ब्रेक थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला.

कुंडेवहाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या जेएनपीटी-वैतरणा सेक्शनमधील एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणापर्यंत सुमारे १०२ किलोमीटर लांबीचा आहे. हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गामुळे जेएनपीटी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे. वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिक्सच्या खर्चात बचत होणार होईल. तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून उद्योग आणि व्यापारासाठी उपयुक्त ठरणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर पडणार आहे. वैतरणापासून ते जेएनपीटी हा १०२ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हे काम करत आहेत तर सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टीआयपीएल हे काम करत आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पातील महत्त्वाच्या अशा कुंडेवहाळ येथील १६९ मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी कुंडेवहाळ येथे टनल ब्रेक थू सोहळा पार पडला. यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बटन दाबून काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले. यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर परमजीत सिंग, टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचे उप्पलपती व्यंकट कुमार, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डायरेक्टर एम.पी. त्यागी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा

या प्रकल्पामुळे मालवाहतूक वेगाने होईल आणि नॅशनल लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, त्यामुळे वाहतूकदारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडे हे काम असून टीआयपीएल सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून योग्य वेगाने हे काम पूर्ण करत आहे, असे सांगून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच पनवेल आणि उरणमध्ये हे प्रकल्प होत असल्याने याचा फायदा परिसरातील नागरिकांना नक्कीच होईल, असेही परेश ठाकूर यांनी अधोरेखित केले.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने किडनी विकली; रोहित पवार आक्रमक, "या निर्दयी सरकारवर...

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक