मुंबई : शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार असून परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता आता परदेशी शिक्षणाचे स्वप्न भारतातच साकार होणार आहे. जगातील पाच नामवंत विद्यापीठ नवी मुंबईत साकारण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग : क्रिएटिंग ॲखन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन (स्कॉटलंड, यूके), युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके), युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया), इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), इस्तितुतो युरोपीओ दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत. याच परिसरात येत्या काही वर्षांत मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील, अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे परिसर शिक्षण व संशोधनासाठी ओळखला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून मुंबईची सध्या ओळख आहे. मात्र आता विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल. विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाईन हे मुंबई, नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विकसित होत आहे. अटल सेतू निर्माण झाला आहे. पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी हे विद्यापीठाशी निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणे शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. सध्या पाच विद्यापीठ आली आहेत. भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला तयार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
...या विद्यापीठांचा समावेश
युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन हे यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून २०० हून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह अनेक दशकांच्या विद्यापीठांची भागीदारी यामध्ये असून आयआयटी - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; एम्स - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस; मणिपाल अकादमी; आयसीएआर - इंडियन कौन्सिल ऑफ ॲलग्रिकल्चरल रिसर्च, आयसीएमआर - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल्ली विद्यापीठाचा समावेश आहे.