नवी मुंबई

नवी मुंबईतील वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

कळंबोली, तळोजा आणि सीवूड्स परिसरात हे अपघात घडले असून पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रविवारी तीन वेगळया अपघातांत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिला वकिलाचा समावेश आहे. कळंबोली, तळोजा आणि सीवूड्स परिसरात हे अपघात घडले असून पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

पहिला अपघात कळंबोली परिसरात रविवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. अनिता मंगेश सरफरे (४२) या आपल्या पतीसह मोटारसायकलवरून अलिबाग येथील आजारी वडिलांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. सायन-पनवेल महामार्गावरील पुरुषार्थ पेट्रोल पंपजवळ भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अनिता सरफरे गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी डंपरचालक छोटन यादव यास अटक केली आहे.

दुसरा अपघात तळोजा येथील नावडे गावासमोरील रस्त्यावर सकाळी घडला. रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने पादचारी मिलींद भिकाजी सुरडकर (५५) यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक पसार झाला असून, तळोजा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तिसरा अपघात रविवारी रात्री सीवूड्स रेल्वे ब्रिज जवळ घडला. करावे गावात राहणारा प्रदीप अशोक सोलंकी (२८) हा आपल्या बुलेटवरून करावे गावाकडे जात असताना सावळा चौकाजवळ भरधाव स्कुटीने त्याला धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी स्कुटीचालक यज्ञेश्वर रमेश कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRDA कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार

Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार

भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी शिंदेसेना आग्रही; मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार

भाजपच्या टोळीने पराभव केला; समाधान सरवणकर यांचा गंभीर आरोप

सायनाचा 'सायोनारा'; वयाच्या ३५व्या वर्षी बॅडमिंटनला अलविदा