नवी मुंबई

नवी मुंबईत पैसे उकळण्यासाठी विवाहितेचे अश्लील फोटो व्हायरल

या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीविरोधात आयटीअॅक्टसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला

वृत्तसंस्था

तळोजा भागात राहणाऱ्या एका विवाहितेचे अज्ञात व्यक्तीने एडीट केलेले अश्लील फोटो तयार करुन ते सदर विवाहितेच्या पतीसह तीच्या नातेवाईकांना पाठवून तीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेने ऑनलाईन साईटवरुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास बजावून सदर व्यक्तीने हा प्रकार केला आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीविरोधात आयटीअॅक्टसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील ४० वर्षीय विवाहितेला गत मे महिन्यामध्ये तीच्या मोबाइलवर लेन-देन, क्रेझी कॅश व व्हीएस इंटरप्रायजेसकडून ऑनलाईन कर्ज मिळणार असल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर सदर कंपनीकडून या विवाहितेला कुठल्याही प्रकारचे मेसेज अथवा कॉल आले नव्हते.

गत आठवड्यात अज्ञात व्यक्तीने या विवाहितेच्या व्हॉट्सअॅपवर सहा वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरुन कर्जाची रक्कम बाकी असल्याचा व सदर कर्जाची रक्कम भरण्याबाबतचा मेसेज पाठवून दिला. मात्र विवाहितेने कर्जाची रक्कम व्याजासह दिली असल्याने तीने सदरचे सर्व मोबाइल नंबर ब्लॉक केले. अज्ञात व्यक्तीने मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी या विवाहितेच्या व्हॉट्सअॅपवर तीचा एडीट केलेला अश्लील फोटो पाठवून दिला. कर्जाची बाकी असलेली रक्कम पाठविण्यास सांगून गुगलपेचा युपीआय नंबर पाठवून दिला. या विवाहितेने घाबरुन सदर युपीआयवरुन ४ हजार रुपये पाठवून दिले. घाबरलेल्या विवाहितेने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्याजासकट लोन फेडूनही फसवणूक

विवाहित महिलेला पैशांची गरज असल्याने तीने सदर ऑनलाईन साईटवरुन ७ दिवसांसाठी ३६०० रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर या विवाहितेने काही दिवसातच ३६०० रुपये मुद्दल व ५४०० रुपये व्याज अशी ९००० रुपयांची रक्कम सदर कंपनीला ऑनलाईन पाठवून दिली होती.मात्र त्यानंतर देखील सदर व्यक्तीने या विवाहितेच्या पतीला तसेच तीच्या २० वर्षीय मुलीला व तीच्या चुलत भावाला त्यांच्या व्हॉट्सअॅपवर विवाहितेचे एडिट केलेले अश्लील फोटो पाठवून देत तीची बदनामी केली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प