नवी मुंबई

काजूचे उत्पादन घटल्याने बियांचे भाव गगनाला; जंगलात लागणाऱ्या वणव्यांचा काजू पिकावर परिणाम

गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये शेकडा दराने मिळणाऱ्या काजूच्या बिया यावर्षी १५० ते २०० रुपये शेकडाने विक्री करण्यात येत आहे.

Swapnil S

तळा : तळा बाजारपेठेत काजू बियांचा दर चढलेलाच असून, यावर्षी उत्पादनात घट झाल्याने बियांचे भाव गगनाला भिडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तळा तालुका हा डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी आंबा, काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येते. तालुक्यातील आदिवासी समाज हा जंगलातील रानमेवा विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. मार्च ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत तालुक्यातील आदिवासी बांधव काजूगर, आंबे, फणस, करवंद, जांभूळ, आदी रानमेवा विकून मिळालेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करतात. हे काजूगर जवळपास पाऊस सुरू होईपर्यंत मिळत असल्याने गोरगरीब आदिवासी बांधवांच्या हाताला काम व पोटाची खळगी भरण्यास आधार मिळतो; मात्र यावर्षी तालुक्यातील विविध जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे बहुतांश काजूची झाडे जळून गेली आहेत. परिणामी यावर्षी काजूचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत काजू बियांच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट दर

गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये शेकडा दराने मिळणाऱ्या काजूच्या बिया यावर्षी १५० ते २०० रुपये शेकडाने विक्री करण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांना गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट दराने काजूच्या बिया खरेदी कराव्या लागत आहेत. लग्नसराईसाठी गावी आलेले चाकरमानी पुन्हा शहराकडे जाताना जंगलातील रानमेवा म्हणून काजू बिया आवर्जून घेऊन जातात; मात्र यावर्षी काजू बियांचे वाढलेले दर पाहता चाकरमान्यांनी देखील आपला हात आखडता घेतला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली