नवी मुंबई

देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; २ पिस्तूल व १ जिवंत काडतूस जप्त

पनवेलच्या नेरे भागात पिस्तूल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गत रविवारी रात्री सापळा रचून अटक केली.

Swapnil S

नवी मुंबई : पनवेलच्या नेरे भागात पिस्तूल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गत रविवारी रात्री सापळा रचून अटक केली. पोलिसांनी या त्रिकुटाकडून २ देशी पिस्तूल व १ जिवंत काडतूस जफ्त केले आहे. या त्रिकुटाचा चौथा साथीदार पाच जिवंत काडतूस घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची मारुती स्विफ्ट कार आणि यामाहा कंपनीची मोटारसायकल देखील जप्त केली आहे. या तिघांनी सदरचे पिस्तूल व काडतूस कुठून आणले याचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

पनवेलच्या नेरे भागात राहणारे काही तरुण ५ लाख रुपयांमध्ये २ पिस्तूल आणि काडतूस विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अजयकुमार लांडगे व धर्मपाल बनसोडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील व त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला. तसेच त्यांच्याजवळ असलेले पिस्तूल ५ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शविली.

रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पनवेलमधील नेरे येथील हॉटेल न्यू रॉयल कॅफे व मटण शॉपजवळ सापळा रचला होता. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास किशोर दत्ता धाडी (२४) व ऋषीकेश रघुनाथ लोटे (२५) हे दोघे मारुती स्विफ्ट कारमधून तर यशवंत बबन सत्रे (२४) व अर्जुन जाधव हे दोघे मोटारसायकलवरून त्याठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाकडील ५ लाखांची रक्कम घेतल्यानंतर अनैतिक मनावी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्याठिकाणी छापा मारून सर्वांची धरपकड केली. यावेळी आरोपी अर्जुन जाधव हा त्यावेळी झालेल्या गडबडीचा फायदा घेऊन पाच जिवंत काडतुस घेऊन पळून गेला.

त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने किशोर, ऋषीकेश आणि यशवंत या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ १ लाख २० हजार रुपये किमतीचे २ देशी बनावटीचे पिस्तूल तसेच १ जिवंत काडतूस सापडले. सदरचे पिस्तूल आणि काडतूस पोलिसांनी जप्त केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत