‘कोल्ड प्ले’कार्यक्रमामुळे नवी मुंबईत वाहतुकीचा फज्जा नवशक्ति
नवी मुंबई

‘कोल्ड प्ले’कार्यक्रमामुळे नवी मुंबईत वाहतुकीचा फज्जा; सोमवारचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा रवींद्र सावंत यांचा इशारा

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जागतिक किर्तीचा 'कोल्ड प्ले' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ जानेवारीपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच दिवशी शीव-पनवेल आणि नेरूळ -जुईनगर अंतर्गत वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जागतिक किर्तीचा 'कोल्ड प्ले' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ जानेवारीपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच दिवशी शीव-पनवेल आणि नेरूळ -जुईनगर अंतर्गत वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात बोजवारा उडाला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी वाहतुकीचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नियमित वाहतुकीला फटका बसणार नाही, असा पोलिसांनी पत्रकार परिषदेत केलेला दावा फोल ठरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर खारघरच्या पुढपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये 'कोल्ड प्ले' संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सर्व तिकीट विक्री झाली असल्याने किमान ७५ हजार श्रोते आणि त्या अंदाजाने १५ ते १८ हजार गाड्या येण्याची शक्यता पोलिसांनी गृहीत धरली होती. त्या अंदाजाने कुठेही वाहतूककोंडी होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. कार्यक्रम रात्री असला तरी दुपारपासून स्टेडियममध्ये सोडण्यात येणार असल्याने दुपारपासून श्रोत्यांची गर्दी जमू लागली आणि तीन साडेतीनपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली.

शीव- पनवेल मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंगीच्या वेगाने पुढे सरकत असल्याने नेरूळपासून पुढे पाच - सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे जडअवजड वाहनांना प्रवेश बंदी घातल्याने वाहतूककोंडी होणार नाही, असा पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. वाहतूककोंडीत जडअवजड वाहने नसूनही नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

पाच-सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वाहतूककोंडी झालेली नसून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. परिसरातील सोसायटींना कुठलीही समस्या आली तर माझा स्वतःचा क्रमांक दिला होता. रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता सोडण्यात आलेला आहे. मोठा कार्यक्रम असल्याने वाहन संख्या वाढली काही समस्या निर्माण झाल्या मात्र त्या तात्काळ सोडवण्यात आल्या आहेत.

- तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

सोमवारचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा

पोलिसांनी वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून स्टेडियम परिसरातील काही रस्ते नियमित वाहतुकीसाठी बंद केले. याचा सर्वाधिक फटका याच स्टेडियमच्या मागील बाजूस डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात येणाऱ्या-जाणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. रुग्णांनाही सोडले जात नसल्याने दुपारी चारच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष शेट्टी आणि काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचे पहावयास मिळाले. या वादानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत रिक्षा स्टॅन्डवर रिक्षाला उभे राहण्यास मुभा दिली. रुग्णांना गाडीने थेट रुग्णालयापर्यंत प्रवेश सुरू केला. याशिवाय शनी मंदिर, एसबीआय, आर्मी गृहनिर्माण संकुल व परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी रस्ता मोकळा करून दिला. रविवारी देखील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागल्यास सोमवारचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा सावंत यांनी दिला.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबई फिरायचीये? मग 'या' चर्चना भेट द्यायला विसरू नका

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक