आपले महानगर
तेजस वाघमारे
लोकलमधून पडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सामान्य लोकल स्वयंचलित दरवाजांच्या करण्याचे ठरवले आहे. प्रायोगिक तत्त्वावर स्वयंचलित दरवाजांची लोकल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र हा प्रयोग खरंच यशस्वी होणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानंतर सुमारे ५० दिवसांत मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजा बसविण्यात आलेला नमुना डबा तयार करण्यात आला आहे. या नवीन रचनेची पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ रोजीपर्यंत तयार होईल, तर आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल. स्वयंचलित दरवाजांच्या लोकल प्रयोगादरम्यान रेल्वे प्रशासनाला यातील अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती उपलब्ध होईल.
मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत-खोपोली व कसारा या मुख्य मार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/वांद्रे हार्बर मार्गावर, ठाणे ते पनवेल/वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर तसेच नेरूळ/बेलापूर ते उरण पोर्ट मार्गावर अशी ३२५ किलोमीटर लांबीची आहे. या उपनगरीय मार्गावर १८१० उपनगरीय लोकल चालविण्यात येतात. तसेच मुख्य मार्गावरून दररोज २१० पेक्षा अधिक मेल एक्स्प्रेसही चालविण्यात येतात. सुमारे २४ तास चालणाऱ्या या सेवेत दररोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणूपर्यंत दररोज सुमारे १४०६ लोकल चालविण्यात येत आहेत. या लोकलमधून ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. गर्दीच्या वेळेत या मार्गावर लोकलमध्ये आत घुसण्यासही जागा नसते. परिणामी कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करतात.
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांत २६ हजार ५७२ प्रवासी जखमी झाले. अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत असले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. लोकलमधून पडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने डिसेंबर २०१९ वातानुकूलित लोकलप्रमाणे सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयोग दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद होण्यासाठी लागणारा कालावधी, प्रवाशांच्या गर्दीमुळे दरवाजा बंद होण्यास येणाऱ्या अडचणींमुळे अयशस्वी ठरला होता. यानंतर आता मध्य रेल्वेकडून सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.
स्वयंचलित दरवाजांच्या लोकल अधिक संख्येने चालविण्यात आल्यास याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होणार आहे. सध्या लोकल स्थानकातून थांबण्यापूर्वीच प्रवासी लोकलमधून उतरण्यास सुरुवात करतात. मात्र मेट्रोच्या धर्तीवर स्वयंचलित दरवाजांच्या लोकल आल्यास लोकल थांबल्याशिवाय प्रवासी उतरू शकणार नाहीत. यामुळे लोकल थांबण्याचा वेळ वाढवावा लागेल. दरवाजे बंद होण्यास आणि उघडण्यास लागणारा वेळ वाढणार असल्याने लोकलचे वेळापत्रक बिघडणार आहे. यासोबतच गर्दीच्या वेळी प्रवासी जोवर लोकलच्या दरवाजातून पुढे सरकणार नाहीत तोवर दरवाजे बंद होणार नाहीत. त्यामुळे लोकल सुरू करण्यात अडचण येणार आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर राहणार असल्याचेच दिसत आहे.
सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहेत. या लोकलला सामान्य लोकलच्या तुलनेने कमी प्रवासी असतात. मात्र गर्दीच्या वेळी प्रवासी दरवाजाला लटकत आल्याने लोकल सुरू होत नसल्याचे प्रकार घडतात. यावेळी रेल्वेचे आरपीएफ जवान प्रवाशांना खाली उतरवून किंवा दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना धक्का देऊन आतमध्ये घुसवून दरवाजे बंद करतात. अशीच वेळ सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे लावल्यानंतर येऊ शकते. त्यामुळे असे प्रयोग करून वेळकाढूपणा करण्यात काहीच हशील होणार नाही.
सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे लावल्यास प्रवासी गुदमरतील अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. यावर उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजांना लूव्हर्स लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या लूव्हर्समधून हवा खेळती राहील. तसेच डब्यामध्ये ताजी हवा पंप करण्यासाठी लोकलच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट लावण्यात येणार आहेत. तसेच सामान्य लोकलचे डबे वातानुकूलित लोकलप्रमाणे एकमेकांना जोडले जातील. यामुळे गर्दी विभाजित करण्यास मदत होणार आहे. यासाठी होणारा खर्च खरंच सार्थकी लागणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.
गर्दीच्या वेळेत लोकलवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये यांनी कामाच्या वेळा बदलाव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले होते. याला विविध संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र याची अंमलबजावणी न झाल्याने हा निर्णय केवळ कागदावर राहिला आहे. लोकल सेवा वाढविण्यासह रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करून गर्दी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्याशिवाय लोकल प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ शकणार नाही.
tejaswaghmare25@gmail.com