संपादकीय

समतेच्या विचारांचे वारकरी होऊ या!

राज्यात गावागावांमधले वारकरी दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. यावर्षी पंढरपूरची वारी लोकसभा निवडणुका झाल्यावर आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या आधी, अशा मधल्या सांध्यावर आली आहे.

नवशक्ती Web Desk

ॲड. वर्षा देशपांडे

- भवताल

राज्यात गावागावांमधले वारकरी दिंड्यांमध्ये सामील झाले आहेत. यावर्षी पंढरपूरची वारी लोकसभा निवडणुका झाल्यावर आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या आधी, अशा मधल्या सांध्यावर आली आहे. सर्वसामान्यांचे राजकीय भान या वारीच्या माध्यमातूनही व्यक्त होत आहे. संविधानातील समतेच्या विचारांचाच प्रसार वारीतले वारकरी करत असतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात पंढरपूरच्या या वारीला आणि विठ्ठलभक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि भारतीय सामान्य नागरिक हा किती शहाणा मतदार आहे हे सिद्ध झाले. हुकूमशाही लादू पाहणाऱ्या, संविधान मोडू पाहणाऱ्यांना आता सामाजिक न्यायासाठी काम करावे लागेल. मागास, गरीब, दलित, अल्पसंख्यांक आणि महिलांना यापुढे सरसकट कोणत्याच राजकीय पक्षाला अथवा विचारधारेला समूह म्हणून गृहीत धरता येणार नाही, याची या समूहाने जाणीव करून दिली आहे. लोक म्हणायचे ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. पण जनतेबरोबर जनसंघटनाही मैदानात उतरल्या होत्या. सरकार कोणाचेही आले तरी सातत्याने जनतेचे प्रश्न लावून धरणारी एक मोठी यंत्रणा देशामध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करीत असते. ती म्हणजे सामाजिक संस्था आणि संघटना. या निवडणुकीच्या दरम्यान सामाजिक संघटनांनी घेतलेली राजकीय भूमिका फार महत्त्वाची ठरली आणि म्हणून या पुढील काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना आता झाली आहे. आता सामाजिक संस्था, संघटनांना ‘आंदोलनजीवी’ म्हणून हिणवता येणार नाही, हे सर्वच आघाड्यांना आणि पक्षांना आता कळलेले आहे. साधने हाताशी असोत अथवा नसोत, बहुसंख्येने लोक सोबत असोत किंवा नसोत, निवडणुका असोत किंवा नसोत, गुन्हे दाखल होवोत किंवा अटक होवो, लोकांचा आवाज बनून रस्त्यात येणाऱ्या लोकनेत्यांनी आणि जनतेने हे संविधान टिकलं पाहिजे, इथली लोकशाही वाचली पाहिजे, अशी भूमिका घेतली.

सतत तलवारीच्या पातीवर चालावे लागेल असे जेमतेम बहुमत देऊन सत्ताधाऱ्यांना गेल्या दहा वर्षांच्या चुका दुरुस्त करण्याची संधी दिली आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनतेवर विश्वास ठेवून ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून साडेसहा हजार किलोमीटर चालणाऱ्या राहुल गांधींना विरोधी पक्षनेता बनावे लागेल, जनतेचा आवाज बनावा लागेल हे जनतेने ठरविले आहे. वाडवडिलांच्या पुण्याईने आणि परंपरेने भारतीय लोकशाहीमध्ये नेता होता येणार नाही, तर लोकांमध्ये उतरून नेतृत्व सिद्ध करावे लागेल, झेलावे लागेल, सोसावे लागेल, चालावे लागेल हे जनतेने या निवडणुकीत दाखवून दिले आहे.

नुकतीच वारी सुरू झाली आहे. विठ्ठल या आपल्या आराध्य दैवतासमोर, आपल्या ध्येयासमोर नम्र होऊन चालण्याची ही ७०० वर्षांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे, ती अनन्यसाधारण आहे. संविधानामध्ये सांगितलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता याच तत्त्वांना अनुसरून एकमेकांच्या पाया पडून माऊली म्हणून एकमेकांचा सन्मान करणारी वारीची परंपरा म्हणजे संविधानाची वारीच आहे. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना पंढरीच्या दिशेने एकाच ध्येयाने प्रेरित होऊन पायी चालत नेणारी ही वारी महाराष्ट्राच्या पुरोगामी सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे. अधर्माविरुद्ध धर्मयुद्ध सुरू झाले असताना महाभारताच्या रणांगणावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाशी नाते जोडणारी, ज्ञानोबारायांच्या पसायदानाचा वारसा चालविणारी आणि निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीचा लोकोत्सव साजरा करणारी ही समतेची वारी म्हणजे ‘विचारांची वारी’ आहे. यामध्ये अविचार, धर्मांधता, जातीयता, कर्मकांड, राजकारण घुसविण्याचा आणि आपापल्या आध्यात्मिक आघाड्या काढून या परंपरा दूषित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या आधाराने सुरू आहे. त्यांच्या प्रवक्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वारकरी वेळीच त्यांची जागा दाखवतील. ही वारी समतेची आहे. श्रीकृष्णाच्या कापलेल्या करंगळीला आपल्या भरजरी शालूची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीच्या भगिनी प्रेमाची आहे. चिरीमिरी देऊन या बहिणींना गंडविणाऱ्यांचा राजकीय विचार धुडकावून लावण्याची क्षमता असलेल्या वारकरी बहिणींचा हा महाराष्ट्र आहे. जनाबाई, सखुबाई, सोयराबाई आणि हो, अक्कमहादेवी यांचा वारसा या वारकरी बहिणांना आहे. म्हणूनच लिंगभेदापलीकडच्या समतेची ही वारी आहे. महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींची, बहिणाबाईंच्या नातींची, जनाबाई आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा... म्हणून प्रसंगी ज्ञानोबारायांनाही शांत करणाऱ्या मुक्ताबाईची, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे असणाऱ्या समतावादी महिलांची ही वारी आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचे कीर्तन करणाऱ्या वारीचे यावर्षीचे आगमन हे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या मधल्या काळात येणे हा विलक्षण योगायोग आहे. वारीमध्ये चालणाऱ्या सर्व समतावादी वारकरी भावा-बहिणींना भक्तीसोबत समतेचा आणि विचारांचा उत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि तुकडोजींची ग्रामगीता आणि गाडगेबाबांचे कीर्तन ते बाबासाहेबांच्या संविधानापर्यंतच्या समतेच्या परंपरेचे पाईक होऊ या, विचारांचे वारकरी होऊ या. (लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी