भवताल
अॅड. वर्षा देशपांडे
भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर युवतीच्या घटनेने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार, कंत्राटी पद्धतीचा शोषणकारी चेहरा आणि पोलिसांच्या अमानुष वर्तनाचे वास्तव उघड केले आहे. या घटनेतून समाजाने या व्यवस्थेतील अंधारावर प्रकाश टाकण्याची वेळ आली आहे.
या सदरासाठी लेख लिहिण्याचा विचार करत असतानाच ऐन भाऊबीजेच्या दिवशी कोथरबन, पो. चिंचवन, ता. वडवणी, जि. बीड या गावातील एम.बी.बी.एस. झालेल्या अविवाहित डॉक्टर युवतीने, जी फलटण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत होती, तिने स्वतःच्या हातावर आपल्या आत्महत्येचे कारण लिहून ठेवून आत्महत्या केली. उच्च विद्याविभूषित, स्वतंत्रपणे नोकरी करणारी, भाड्याचे घर घेऊन स्वतंत्र राहणारी ही तरुणी आपल्या आत्महत्येच्या कारणाच्या संदेशात लिहिते की, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी एका केसमधील शवविच्छेदनाचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला आणि वेळोवेळी बलात्कार केला, असे लिहिले आहे. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्रातील आरोग्य सेवेमध्ये थेट आरोग्य विभाग म्हणून नेमणुका जवळजवळ नाहीतच. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु तज्ज्ञ माणसांच्या नेमणुका थेट सरकारकडून नाहीत आणि जे नेमलेले आहेत ते सरकारी यंत्रणेत फक्त सहीपुरते येऊन जातात. गलेलठ्ठ पगार आणि सगळ्या सोयी उपभोगतात आणि मोठ्या प्रमाणावर स्वतःची खासगी रुग्णालये, हॉस्पिटल्स चालवतात. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात केवळ आपले वैयक्तिक हॉस्पिटल्स आणि रुग्णालयांकडे रुग्ण वळविण्यासाठी उपयोगात आणतात. राज्यभर कार्यरत असणारी १०८ नंबरची ॲम्ब्युलन्स देखील थेट रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये न नेता यांच्या खासगी दवाखान्यात घेऊन जातात. मुळातच कंत्राटी पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, त्यात तैनात करण्यात आलेले ड्रायव्हर्स, डॉक्टर्स आणि टेक्निशियन्स हेही कंत्राटीच असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण घेतल्या घेतल्याच नातेवाईकांना घाबरवून सोडतात. सरकारीत रुग्ण नेऊ नका. तेथे स्वच्छता नाही, डॉक्टर नाही, मशिनरी नाही, औषधे नाहीत, तुमचा रुग्ण वाचणार नाही. त्यापेक्षा अमुकतमुक खासगी रुग्णालयात घेऊन चला, तेथे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, असे मार्केटिंग करतात. त्याबद्दल त्यांना अमुकतमुक हॉस्पिटलकडून कमिशन मिळते पेशंट आणल्याबद्दल. संपूर्ण सरकारी आरोग्य व्यवस्था ही कंत्राटी पद्धतीच्या भरवश्यावर एसटी महामंडळाप्रमाणेच राज्यभर आजारी अवस्थेत कशीबशी तग धरून आहे. प्रशासनाच्या सर्वोच्च पदापासून ते शेवटच्या स्वच्छता कामगारांपर्यंत अनेक जागा रिक्त आहेत आणि बऱ्याच जागा या कंत्राटी पद्धतीने चालविल्या जात आहेत.
त्यामुळे स्वतः लैंगिक हिंसेचा बळी पडलेल्या, आरोग्य यंत्रणेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिलेला लैंगिक अत्याचारापासून कोणतेही संरक्षण मिळालेले नाही. या ग्रामीण रुग्णालयामध्ये लैंगिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारी समिती आहे. या समितीची आत्महत्येनंतर काय भूमिका आहे? त्यांनी या आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. ही समिती प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली कार्यरत आहे किंवा कसे, याबाबतही चौकशी करण्यात यावी. सदर समिती ही सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यास अपुरी पडली आहे. अशा समितीच्या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण मिळत नाही. अशी घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी त्या कंत्राटदारांकडे जाते, असे प्रशासनातून सांगण्यात येते. सदर युवतीला प्रशासनातील कामामुळेच दबाव आला, वाद झाला, तक्रार झाली, त्यामुळेच वेळोवेळी बलात्कार सोसावा लागला, असे तिच्या आत्महत्येच्या दरम्यान लिहिलेल्या संदेशावरून लक्षात येते. प्रशासकीय काम करीत असताना होणाऱ्या या प्रकारच्या छळाला आणि अत्याचाराला कंत्राटदार जबाबदार की प्रशासन हा वाद सुरू राहील. पण दरम्यान पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या कायद्याच्या रक्षकांनी एका तरुणीला आपले जीवन संपवण्यास भाग पाडले, ही वस्तुस्थिती आहे. एम.बी.बी.एस.पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुण मुलीचा हा दुर्दैवी अंत दुःखद म्हणण्यापेक्षा चीड आणणारा आहे. महिला डॉक्टर आणि पोलिसांमध्ये वाद सुरू होता. त्याबाबत अंतर्गत चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान तिने माझ्यावर अन्याय होतोय. मी आत्महत्या करीन, असे लेखी स्वरूपात कळविलेले होते. असे असताना वेळीच ठोस उपाययोजना करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्याने सदर तरुणीने आपले जीवन संपवले, असे दिसत आहे. नीतिशून्य आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या या व्यवस्थेत कंत्राटदाराच्या उपकारावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणारा हा तरुण कर्मचारी वर्ग व्यवस्थेचा बळी ठरतो आहे आणि दिवसेंदिवस गैरजबाबदार लोकप्रतिनिधी, मस्तवाल प्रशासन आणि पुढाऱ्यांच्या मदतीने कंत्राट घेणारे मुजोर कंत्राटदार अशा तिहेरी विळख्यात महाराष्ट्राचे शासन आणि प्रशासन अडकलेले आहे. कुंपण शेत खात आहे. कायद्याचे रखवालदार पोलीस यांना ना कायद्याची ना नैतिकतेची चाड राहिली आहे. इंग्रजांनी पोलिसांना जनतेचे शोषण करण्यासाठी मागे ठेवून गेले आहे, असे वाटावे इतके हे जनसामान्यांना पोलीस नडत आहेत. वेळोवेळी जनआंदोलन करून मिळवलेले कायदे हे जरी जनतेच्या हितासाठी असले, तरी चालवणारी यंत्रणा ही अन्याय करणाऱ्या धनदांडग्यांच्या, पुरुषी व्यवस्थेच्या दावणीला बांधली गेली आहे. पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्रात त्यातही सावित्रीचे जन्मगाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यात डॉक्टरीचे शिक्षण घेतलेल्या एका तरुणीला आत्महत्येचा निर्णय करावा लागतो आणि तोही कंत्राटदाराकडून आणि प्रशासनाकडून पाठबळ न मिळाल्यामुळे आणि कायद्याच्या रखवालदारांनी केलेल्या अत्याचारामुळे ही घटना घडते, हे लाजिरवाणे आहे.
पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होईलच आणि तो करावाच लागेल. बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जामीन मिळता कामा नये. संबंधित व्यक्तीला त्वरित शिक्षा झाली पाहिजे यासाठी डॉक्टरांच्या आणि महिला डॉक्टरांच्या संघटनेने भूमिका घेतली पाहिजे. महिला संघटनांनीही पुढे आले पाहिजे. ही आत्महत्या नसून आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी घेतलेला हा बळी आहे, व्यवस्थेने केलेला हा एकाप्रकारे खूनच आहे.
एका बाजूला मुलींचा जन्म आणि त्यांचे अस्तित्व याच आव्हान आमच्यासमोर उभे आहे. दुसऱ्या बाजूला पटसंख्या कमी आहे म्हणून बंद होऊ घातलेल्या शाळांमुळे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे म्हणून आम्ही चिंतित आहोत, तर तिसरीकडे शिक्षण घेतल्यानंतरही प्रशासनात काम करताना मुलींचे असे बळी जात असतील, तर अधिकच चिंतेत भर पडली आहे. धर्मांध, जात्यांध, स्त्रीविरोधी, बुरसटलेल्या भ्रष्टाचारी, नीतिशून्य व्यवस्थेने संपूर्ण ‘गव्हर्नन्स’ नावाची व्यवस्था पोखरली आहे. न्यायासनावर बूट उगारले जात आहेत. अशा निराशाजनक परिस्थितीमध्ये, अंधारलेल्या सामाजिक वातावरणात जनतेनेच सामूहिक शहाणपण दाखवून आपल्या हातातील पणती तेवत ठेवून आवाज उठवण्याची गरज आहे. सामूहिक शहाणपण दाखविण्याची गरज आहे. समस्त वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना विनंती आहे “अंधार फार झाला, पणती जपून ठेवा”.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक