संपादकीय

सण-उत्सवांचे मोल जपूया!

धार्मिक वा आध्यात्मिक कार्यक्रमात राजकारण असायला नको. कंपन्या, कोर्पोरेट्स यांचे या ठिकाणी काहीच स्थान असण्याची गरज नाही. पारंपरिक सण-उत्सवात साधेपणा, सोज्वळपणा आणि सात्विकता होती.

नवशक्ती Web Desk

- डॉ. संजय मंगला गोपाळ

लक्षवेधी

धार्मिक वा आध्यात्मिक कार्यक्रमात राजकारण असायला नको. कंपन्या, कोर्पोरेट्स यांचे या ठिकाणी काहीच स्थान असण्याची गरज नाही. पारंपरिक सण-उत्सवात साधेपणा, सोज्वळपणा आणि सात्विकता होती. मात्र सण जेव्हा सार्वजनिक होतात, त्यासाठी वर्गणी गोळा करणे किवा प्रायोजक शोधणे जसे सुरू होतात तसे ते सण आणि ते साजरे करण्याच्या पद्धती यात बदल सुरू होतो. आजच्या काळातील सार्वजनिक सण उत्सवांचे स्वरूप आणि त्यातून उभे रहाणारे सामाजिक मुद्दे यांचा परामर्श घेणे आवश्यक आहे.

अलीकडेच तीन चार सण लागोपाठ साजरे झाले. आधी कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने होणारा दहीहंडी उत्सव, मग गणेशोत्सव. याच दरम्यान झालेला मुस्लिमांचा ईद ए मिलाद उन नबी. मल्याळम हिंदूंचा ओणम. जैनांचा पर्युषण पर्व - संवत्सरी महोत्सव. आणि आता पितृ येऊ घातलेला नवरात्रोत्सव, मग दसरा आणि मग दिवाळी. अलीकडे यातल्या काही सणांची नुसती नावं ऐकली तरी त्या सणांच्या काळात मानवी अभिव्यक्तीचा दिवसेंदिवस अभिनव बनत जाणारा आविष्कार अनुभवण्याच्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा येतो. मग त्या सणांचा पारंपरिक साधासुधा आविष्कार आठवला की आपण कुठून कुठे मजल मारली आहे याची जाणीव होते. उदाहरणार्थ वस्ती-चाळ-वाडीत पूर्वी सहज दोन-तीन थरात हात पोहोचेल अशा बेताने बांधल्या जाणाऱ्या हंड्या, त्या तिथल्याच मुली-मुलांनी जल्लोष करत फोडण्याची धमाल. त्याला आबालवृद्धांचा पाठिंबा, दहीकाल्याचा प्रसाद आणि हंडी फोडल्यावर फोडलेल्या मटकीचा खाली पडलेला तुकडा घरी नेण्याची रीत.

आज त्या जागी सात-आठ-नऊ आणि दहा थर रचून दही हंडीला सलामी देण्याचा थरार रंगवण्यात येतो. या चढाओढीला आकर्षक रोख बक्षिसांची लालूच राजकीय नेते आणि त्यांचे धनिक पाठीराखे दाखवत असतात. आणि मग वस्ती-वाडी वा चाळीपुरता रंगणारा हा कृष्ण खेळ आता बस, ट्रक आणि सुसाट दुचाकी वाहानांचा ताफा घेवून शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरपूर आवाज आणि कचरा करत तथाकथित मानाच्या हंड्यांना सलामी देत फिरत रहातो. पाऊस नसला तरी टँकरच्या पाण्याचा फवारा, डिजेचा दणदणाट, अनेक ठिकाणी भर रस्त्यात वा चौकात लावलेल्या हंड्यांमुळे होणारा ट्राफिक जॅम हे सारे जनसामान्यांना मोफत बहाल करण्यात येते. हीच स्थिति गणेशोत्सवाच्या काळातली. दही हंडी उत्सव एका दिवसाचा तर सार्वजनिक गणेशोत्सव १० दिवसांचा. या उत्सवांच्या तयारीसाठी सार्वजनिक ठिकाणी तयारीसाठी खूप आधीपासूनच पब्लिक प्रॉपर्टी ताब्यात घेऊन वातावरण तापवण्यास सुरुवात होते ती वेगळीच.

दही हंडी असो वा गणेशोत्सव वा ईद ए मिलाद या सर्व ठिकाणी कानठाळ्या बसवणारा आवाज जितका मोठा तितका ‘आपला’ उत्सव मोठा वा मानाचा असा समज हे उत्सव साजरे करणारे काही कार्यकर्ते मनापासून करून घेतात आणि इतरांनाही तसे मानण्यास भाग पाडतात. आपल्या साजरीकरणाने जितका मोठा आवाज होईल, आपल्या मिरवणुकीत जितकी अधिक माणसे जमा होतील, जितका जास्त रस्ता वा चौकच नाही तर मूर्तींच्या वाढत्या उंचीनुसार आकाशही व्यापले जाईल तितका आपला उत्सव ग्रेट, मोठा आणि मानाचा अशी जणू संविधानात वा कायद्यात तरतूद केली असावी, अशा थाटात वा ‘अधिकारा’त या उत्सवांचे कर्ते धर्ते कार्यकर्ते टेचात वावरत असतात.

अलीकडे या उत्सवांच्या मिरवणुका वा मंडप परिसरात डीजे आणि देखावे यांच्या सोबत लेजर किरणांची आतषबाजी सुरू झाली आहे. मोठा आवाज, खूप मोठा प्रकाश त्या प्रकाश किरणांची उलट सुलट आवर्तने म्हणजे आपला खास ठसा असा समज बळकट बनवण्यात येतो आहे. सण – उत्सवातील साधेपणापेक्षा भपकेबाजाची सवय लावत त्यासाठी वारेमाप पैसा खर्च केला जातोय. पूर्वी सण उत्सव नागरिकांच्या वर्गणीवर चालत तेंव्हा या दणदणाटी माहोल साठी लागणारा निधीही उपलब्ध नसे. आता जनवर्गणी पेक्षा राजकीय नेत्यांनी केलेल्या पाण्यासारख्या पैशाच्या वापरामुळे हे सर्व चोचले सहज शक्य झाले आहेत. या व्यापात आपण या सण उत्सवांच्या मागील मूळ भक्ती भावना, श्रद्धा, धार्मिकता आदी बाबी विसरत चाललो आहोत की हे सण अशा थाटात साजरे करणार्‍यांना त्याचा आधीच विसर पडलेला असल्यामुळेच हे होते आहे, ते सांगणे कठीण आहे. दही हंडी उत्सवात थरांवर थर लावण्याच्या नादात गेल्या काही वर्षात गंभीर जखमी झालेल्या गोविंदाची आजची स्थिति अत्यंत निराशाजनक आहे. लाखोंची बक्षिसे लावून थरांची ऊंची वाढवणारे पुरस्कर्ते या जखमी खेळाडूंची किती काळ आणि किती व्यवस्थित काळजी वाहतात हा संशोधनाचा विषय ठरावा. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जखमी होणारे वा विसर्जन घाटावर बुडून जीव गमावल्याची प्रकरणेही दिवसेंदिवस वाढत चालली आहेत.

या सगळ्याचा रस्त्यावरून प्रवास करणार्‍या सामान्य नागरिकांना, रुग्णांना, रुग्णवाहिकांना, लहान मुलांना जो त्रास होतो, त्यामुळे जे जीव गमावले जातात त्याची तर गणतीच नाही. एक दिवस जरा मजा केली तर काय झाले? आमचा धर्म आम्ही पाळतो तुमच्या पोटात का दुखावे? या सारखे कमकुवत बचाव करण्याचा प्रयत्न होतो. या सण उत्सवांबरोबरच खेळातील यश असो वा गल्लीतल्या एखाद्या नेत्याचा वाढदिवस असो, कुणी नेता एखाद्या खटल्यातून निर्दोष सुटो नाही तर नुसता जामीनावर सुटलेला असो. या सगळ्या इवेंट्सचीही हल्ली या सण उत्सवात भर पडलेली असल्याने १ – ५ – १० असे करत करत वर्षाचे बारा महीने आणि ३६५ दिवस हा ज्वर या ना त्या स्वरुपात सुरूच असतो. कायद्याने, न्यायालयाच्या आदेशांप्रमाणे या सगळ्यावर न्याय्य मर्यादा आहेत. मात्र जेंव्हा सत्ताधारी राजकारणीच अशा वेडाचाराला खतपाणी घालतात, चारापाणी पुरवतात तेंव्हा कुंपणच शेत खाताना पहावे लागते. तक्रार करणार्‍या दक्ष नागरिकांनाच ‘कार्यकर्त्यांचा’ मार खावा लागतो किंवा पोलीसच तक्रारकर्त्याला गप्प बसण्याचा सल्ला तरी देतात किंवा तक्रारीकडे चक्क कानाडोळा करतात. निवडून आलेले आमदार सत्ताधार्‍यांच्या इशार्‍याबरहुकूम उत्तेजक, भडकावू व चिथावणीखोर भाषा वापरतात आणि वर आमचा सागर बंगल्यावरचा बॉस आम्हांला संरक्षण देणार असे सांगतात तेंव्हा सुजाण नागरिकांना अधिक नेटाने आणि सनदशीर मार्गांचा वापर करतच आपल्यापाठी अधिक जनमत उभे करत राहावे लागेल आणि आपल्या सर्वधर्मीय सण-उत्सव साजरीकरणाला येत चाललेले हे बीभत्स स्वरूप रोखावे लागेल. सार्वजनिक सण उत्सवांच्या निमित्ताने आपसात होणारी सामाजिक – सांस्कृतिक घुसळण मानवी सभ्यता विकसित करण्यासाठी अनमोल आहे. सार्वजनिक सण उत्सवांचे ते मोल जपूया!

(लेखक ‘भारत जोडो अभियान’ या नागरिकांच्या राजकीय मंचाचे राज्य समन्वयक व राष्ट्रीय सचिव आणि ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वया’चे राष्ट्रीय समन्वयक आहेत.

sansahil@gmail.com)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी