संपादकीय

‘भाजपा’ झाली ‘मोदीशहापा’ याचसाठी केला होता का अट्टाहास?

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती.

Swapnil S

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

भारतीय जनता पार्टी म्हटले की आठवते अटलबिहारी वाजपेयी यांची वाणी, लालकृष्ण अडवाणी यांची निर्भीड रथयात्रा, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, प्रमोद महाजन, साध्वी ऋतंभरा यांची राम मंदिर आंदोलनातील भाषणे, महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, प्रकाश जावडेकर अशी कितीतरी मंडळी ज्यांनी भाजपा खऱ्या अर्थाने रुजवली, वाढवली आणि देशाच्या इतिहासात कधी नव्हे ती सत्तेपर्यंत नेली. महाराष्ट्रात एकीकडे सगळे तरुण बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आकृष्ट होत होते तर दुसरीकडे भाजपच्या मुंडे-महाजन यांच्याकडे. आज मात्र मुंडे-महाजनांची ती भाजपा कुठेच दिसत नाही. आज भाजपात दिसतात ती भाडोत्री, भ्रष्टाचारी आणि भंपक माणसे जी नेता म्हणून मिरवतात, भ्रष्टाचार करतात आणि स्वतःचे भले व राज्याचे वाटोळे करतात. मोदींच्या सत्ताकाळात ‘भाजपा’ आता ‘मोदीशहापा’ झाली आहे. असे का झाले? याचसाठी केला होता का अट्टाहास?

नव्वदीच्या दशकात राजकारणात येणाऱ्या तरुणांना देशाचे नेतृत्व म्हणून जसे बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे आकर्षण होते तसे राज्याचे नेतृत्व म्हणून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, छगन भुजबळ या नेत्यांचेही मोठे आकर्षण होते. बाळासाहेब हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी आणि हिंदू कुटुंबाचे घरातले पालकच जणू. त्यांनी सांगितले की ठरले, असे महाराष्ट्रातील घराघरात बोलले जायचे. त्यांनीच भाजपला अक्षरशः आपल्या खांद्यावर घेतले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे सख्खे मेहुणे तर त्यांचे एकदम घरातले. नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, प्रकाश जावडेकर हे देखील बाळासाहेबांना अतिशय प्रिय होते. भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये बाळासाहेब हे नाव अतिशय आदराने घेतले जाई. त्याकाळात काही ठरावीक तरुणांना पत्रकार म्हणून काम करताना बाळासाहेब आणि प्रमोद महाजन यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. तरुण पत्रकार म्हणून मी देखील त्यातला एक होतो. या नेत्यांना भेटल्यावर, बोलल्यावर, त्यांच्या मुलाखती घेतल्यावर एक आत्मिक समाधान वाटायचे. देशाला दिशा जर कोणी देऊ शकत असेल तर केंद्रात भाजपा आणि राज्यात शिवसेना हेच ते पक्ष आहेत, असे वाटायचे. याच नेत्यांच्या प्रभावामुळे पुढे आम्हीही राजकारणात आलो. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांसोबत कार्यरत राहिलो, आजही आहोत. पण आताची भाजपा विशेषतः गेल्या दहा-पंधरा वर्षांमधील भाजपा, त्यातही प्रमोद महाजनांचे अकाली निधन झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंना एकटी पाडणारी, गडकरी-मुंडेमध्ये वाद वाढवणारी, देवेंद्रसारख्या विद्वान नेत्याला एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्या विरोधात उभी करणारी भाजपा वेगळी आहे. अंतर्गत कलहाने व्यापलेली आजची भाजपा पाहिली की असे वाटते, यासाठीच भाजपच्या श्रद्धेय नेत्यांनी केला होता का अट्टाहास?

भाजपाचा इतिहास काय आणि आज भाजपा करतेय काय?

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये पूर्णपणे सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ तीन जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली आणि मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदुवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.

जनसंघ ते जनता पार्टी आणि भाजपा

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात जावे लागले. १९७७ साली आणीबाणी उठवल्यानंतर जनसंघ भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांची आघाडी असलेल्या जनता पार्टीत सामील झाला. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पार्टीचे नेतृत्व करत होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पार्टीला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान, तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपाचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. पक्षाच्या घटनेनुसार भाजपा राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजींनी सांगितलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध होता. भाजपा आर्थिक व राजकीय शक्तींच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले होते.

आताचे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केवळ नाममात्र

आजपर्यंतचे भाजपाचे अध्यक्ष एका चढत्या आणि उतरत्या कमानीप्रमाणे होते. मात्र आताचे अध्यक्ष केवळ नाममात्र असल्याचे जाणवते. कधी त्यांना अमित शहा ओढत नेतात, तर कधी मोदी दुर्लक्षित करतात. भाजपाने गेल्या ४४ वर्षांच्या कालावधीत पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी एकापेक्षा एक नेते निवडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आजपर्यंत अगदी गडकरी अध्यक्ष होईपर्यंत भाजपाची सूत्रं सांभाळत होता, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. मात्र त्यानंतर मोदींच्या रूपाने एकाधिकारशाही आली. त्यानंतर सतत सत्ता आणि ती मिळवण्यासाठी पायदळी तुडवल्या गेलेल्या साऱ्या नीतिमत्ता अशीच अवस्था भाजपाची होऊ लागली. १९८०-८६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर १९८६-९१ मध्ये लालकृष्ण अडवाणी, १९९१-९३ मध्ये मुरली मनोहर जोशी, १९९३-९८ मध्ये पुन्हा लालकृष्ण अडवाणी, १९९८-२००० मध्ये कुशाभाऊ ठाकरे, २०००-०१ मध्ये बंगारू लक्ष्मण, २००१-०२ मध्ये के. जन. कृष्णमूर्ती, २००२-०४ मध्ये व्यंकय्या नायडू, २००४-०६ मध्ये पुन्हा लालकृष्ण अडवाणी, २००६-०९ मध्ये राजनाथ सिंह, २००९-१३ मध्ये नितीन गडकरी, २०१३-१४ मध्ये पुन्हा राजनाथ सिंह, २०१४-२० मध्ये अमित शहा आणि सध्याचे भाजपाचे चौदावे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०२० पासून कार्यरत असलेले जगत प्रकाश नड्डा अशा नेत्यांनी भाजपाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र आताचे अध्यक्ष हे केवळ दिखाव्यापुरते असल्याचे जाणवते. समाज माध्यमांवरील अनेक व्हिडीओंमधून अमित शहा आणि मोदी त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष करतात हे दिसून येते.

भंपक भ्रष्टाचारी नेत्यांचा पक्ष

आज भाजपाच्या नेत्यांच्या नावावर नजर टाकली की त्यात भ्रष्टाचारी नावेच अधिक दिसतात. भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये सामील व्हा, असेच इतर भ्रष्टाचाऱ्यांना वाटते. जिथे साध्वी ऋतंभरा आणि साध्वी उमा भारती यांनी काम केले त्या पार्टीत चंबलची गुन्हेगारदेखील सहज सामील होते. केवळ सतत सत्ता उपभोगणे हेच भाजपाचे ध्येय बनले आणि त्यामुळेच आजची भाजपा भंपक भ्रष्टाचारी नेत्यांचा पक्ष झाली आहे.

भाजपाची झाली मोदीशहापा

भाजपात सामील झालेल्या अनेक भ्रष्टाचारी नेत्यांची यादीच देता येईल. यातल्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा महाराष्ट्रातील जनतेच्या चांगल्याच स्मरणात आहेत. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी एकीकडे भाजपा पूर्णपणे ताब्यात घेतली. आधी अमित शहा आणि आता नड्डा यांच्यासारखे केवळ मोदींची स्तुतिसुमने गाणारे पक्षाध्यक्ष बनवले आणि दुसरीकडे ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांना आपले बटीक बनवून त्यांच्यामार्फत बलाढ्य राजकीय नेत्यांना जेरीस आणले. २००५ ते २०२३ या १८ वर्षांच्या कालावधीत ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली. चौकशी केल्यानंतर सत्यावर आधारित फक्त २५ खटले निघाले. त्या २५ खटल्यांपैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. हे करत असताना ईडी कोणाच्या मागे लागली? गेल्या १८ वर्षांत १४७ नेत्यांची चौकशी झाली. त्यात ८५ टक्के नेते विरोधी पक्षाचे होते. भाजप सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, सात माजी खासदार यांचा समावेश होता. हा सर्व ‘मोदी पर्वामधला इतिहास’ असून तो कायम लक्षात राहील. मोदींनी भाजपासारख्या ध्येयवादी पार्टीला आपली बटीक बनवून ‘भाजपा’ची ‘मोदीशहापा’ केली आणि देशाच्या इतिहासात कधीही न विसरता येणारे दहा वर्षांचे कर्म लिहून ठेवले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ‘मोदीशहापा’ सत्तेत आली तर आता देश पुढे कोणत्या दिशेने जाईल हे सांगणे कठीण आहे.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी