संपादकीय

मुंबईची प्रगती - शब्द ठाकरेंचा!

ठाकरे बंधूंच्या ऐक्याने मुंबईच्या राजकारणात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती घडण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘करून दाखवलेय आणि पुन्हा करून दाखवणार’ हा शब्द ठाकरेंचा ही केवळ घोषणा नसून मुंबईचा विकास खात्रीशीर होईल असा विश्वास आहे.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

ठाकरे बंधूंच्या ऐक्याने मुंबईच्या राजकारणात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती घडण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘करून दाखवलेय आणि पुन्हा करून दाखवणार’ हा शब्द ठाकरेंचा ही केवळ घोषणा नसून मुंबईचा विकास खात्रीशीर होईल असा विश्वास आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ४ जानेवारी २०२६ रोजी शिवसेना भवनात एक ऐतिहासिक क्षण घडला. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी ‘शिवशक्तीचा वचननामा - शब्द ठाकरेंचा’ हा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्याची टॅगलाइन 'मुंबईची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान' अशी आहे, जी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय वारश्याची आणि मुंबईच्या मराठी अस्मितेची आठवण करून देते. हा वचननामा केवळ निवडणुकीचा दस्तावेज नाही, तर तो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा आणि मुंबईमध्ये पुन्हा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार आहे.

मुंबईच्या राजकारणात ठाकरे नावाचा ब्रँड नेहमीच प्रभावी राहिला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर २५ वर्षे सत्ता गाजवली. १९९७ ते २०२२ पर्यंत शिवसेनेने मुंबईला आकार दिला- कोस्टल रोड, मेट्रो, फ्लायओव्हर्स, गिरणी कामगारांसाठी घरे, मराठी माणसाचा स्वाभिमान, असे अनेक प्रकल्प आणि धोरणे याच काळात राबवली गेली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना राज्याच्या विकासाला गती दिली, तर

राज ठाकरे यांनी मनसेतून मुंबईच्या मराठी अस्मितेला आवाज दिला. आता दोघे बंधू एकत्र आले आहेत आणि त्यांचा हा वचननामा मुंबईकरांना मूलभूत सुविधा, स्वाभिमान आणि विकासाचे आश्वासन देतो.

या वचननाम्यातील मुख्य घोषणा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. घरकुल आणि मालमत्ता कर सवलतीपासून ते महिलांच्या सशक्तीकरणापर्यंत, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि पायाभूत सुविधांपर्यंत सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, ७०० चौ. फूटपर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याची घोषणा ही सामान्य मुंबईकरांसाठी मोठी दिलासा देणारी आहे. कोळीवाड्यातील बांधकामे नियमित करणे, गिरणी कामगार, पालिका कर्मचारी, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देणे अशा घोषणा मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या हिताला प्राधान्य देतात. पुढील पाच वर्षांत १ लाख स्वस्त घरे बांधण्याचे उद्दिष्ट हे मुंबईतील गृहनिर्माण संकटावर ठोस उपाय आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांना स्वाभिमान निधी - घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना दरमहा १,५०० रुपये स्वाभिमान निधी देणे, १० रुपयांत नाश्ता आणि जेवण उपलब्ध करणे, पाळणाघरे (क्रेच) सुरू करणे, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना महिलांना आर्थिक आणि सामाजिक सक्षम बनवतील. माँ साहेब किचन्स आणि स्वच्छतागृहे अशा सुविधा कष्टकरी महिलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केल्या आहेत. ही केवळ आश्वासने नाहीत, तर ठाकरे कुटुंबाने यापूर्वी राबवलेल्या योजनांचा विस्तार आहे.

आरोग्यदायी मुंबई - आरोग्य क्षेत्रात मुंबईकरांसाठी मोफत औषधे, गल्लीबोळात बाइक ॲम्ब्युलन्स, स्वतंत्र कर्करोग रुग्णालय, महापालिका रुग्णालयांचे आधुनिकीकरण अशा १० हून अधिक घोषणा आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी २४x७ हेल्थ कंट्रोल रूम आणि घरपोच सेवा, पाळीव प्राण्यांसाठी क्लिनिक आणि ॲम्ब्युलन्स अशा नावीन्यपूर्ण कल्पना मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. वर्षभर नालेसफाई, उत्तम रस्ते (१५ वर्षांची हमी), बेस्ट बस सेवा सुधारणा अशा घोषणा वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या समस्या सोडवतील.

शैक्षणिक क्रांती - महापालिका शाळांमध्ये १२वी पर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू करणे, ८वी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब वितरण, मराठीसह ८ भाषांमध्ये मोफत शिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने देशातील सर्वात मोठे ग्रंथालय, बाळासाहेब ठाकरे नावाने कला महाविद्यालय अशा घोषणा विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देतील. महापालिका शाळांची जमीन बिल्डरांना देणार नाही, तर ती सुधारण्यासाठी वापरली जाईल, हा निर्धार मुंबईच्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला मजबूत करेल.

मोकळ्या जागांचे संरक्षण - मोकळ्या जागांचे संरक्षण (महालक्ष्मी रेसकोर्स, आरे, संजय गांधी उद्यान बिल्डरांना नाही), प्रत्येक वाॅर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सर्व धर्मांच्या स्मशानभूमींचा विकास आणि मुंबईत म्युझियम उभारण्यात येईल. मराठी तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्रे आणि वसतिगृहे ही रोजगाराभिमुख असतील.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी श्रेयवाद करतात. कोस्टल रोड, मेट्रोसारखे प्रकल्प शिवसेनेच्या काळात सुरू झाले, तरी त्याचे श्रेय घेतले जाते. राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे म्हटले की, २० वर्षांनंतर शिवसेना भवनात येणे जेलमधून सुटल्यासारखे वाटते. दोघांनी मराठी महापौराचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत मुंबईची अस्मिता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुंबईकरांनो, हा शब्द ठाकरेंचा आहे - मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण गेल्या काही वर्षांत तिच्या समस्या वाढल्या आहेत. वाहतूककोंडी, प्रदूषण, घरांच्या किमती, आरोग्य सुविधांचा अभाव. ठाकरे बंधूंची युती आणि हा वचननामा या समस्यांवर ठोस उपाय सुचवतो. शिवसेनेच्या सत्ताकाळात मुंबई जगातील प्रमुख शहरांमध्ये गणली गेली. आता पुन्हा ते करून दाखवणार आहोत. मुंबईकरांनो, हा शब्द ठाकरेंचा आहे. विश्वासार्ह, ठोस आणि मुंबईच्या हिताचा. निवडणुकीत हा शब्द सिद्ध होईल आणि मुंबई पुन्हा ठाकरेंच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या मार्गावर निघेल.

करून दाखवलेय आणि पुन्हा करून दाखवणार!- ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा म्हटलं की, ‘करून दाखवले’ ही टॅग लाइन नेहमीच आठवते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर सुमारे २५ वर्षे (१९९७ ते २०२२) सत्ता गाजवली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना (२०१९-२०२२) राज्यपातळीवरही महत्त्वाचे निर्णय घेतले. कोस्टल रोड हा प्रकल्प शिवसेना-भाजप युतीच्या काळात सुरू झाला (२०१८-१९ मध्ये मंजुरी). उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला गती मिळाली. आज हा रोड मुंबईच्या वाहतूककोंडीत मोठा दिलासा देतो. मुंबई मेट्रो मेट्रो-३ (कुलाबा-सीप्झ), मेट्रो-२ए, २बी, ४, ४ए असे अनेक मार्ग शिवसेनेच्या काळात मंजूर आणि सुरू झाले. मुंबईच्या वाहतुकीला आधुनिक पर्याय देण्याचे श्रेय शिवसेनेला जाते. ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) हा प्रकल्पही उद्धव सरकारच्या काळात वेगाने पुढे सरकला. फ्लायओव्हर्स आणि रस्ते ईस्टर्न फ्रीवे, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर फ्लायओव्हर्स असे अनेक प्रकल्प शिवसेनेच्या महापालिका सत्ताकाळात पूर्ण झाले. वांद्रे-वरळी सीलिंक हा प्रकल्प काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सुरू झाला, पण शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला आणि नंतरच्या विकासाला जोडला. शिवसेनेने मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याच्या धोरणाला बळ दिले. लाखो कुटुंबांना हक्काची घरे मिळाली. गिरणी कामगारांसाठी घरे आणि मुंबईला मोकळा श्वास देणारे प्रकल्प शिवसेनेच्या काळात पुढे आले. महापालिका आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य देण्याचे धोरण शिवसेनेने राबवले. व्यावसायिक आस्थापनांवर मराठी फलक अनिवार्य केले. शिवसेनेने मुंबईला सतत मराठी महापौर दिले, आजतागायत २३ महापौर मराठीच दिले. १९९७ ते २०२२ पर्यंत मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती आणि महापौर पद शिवसेनेकडे होते. सर्व महापौर मराठी भाषिक आणि महाराष्ट्रातील होते, ज्यामुळे शिवसेनेने ‘मुंबईचा महापौर मराठीच’ ही भूमिका कायम ठेवली. केईएम, नायर, सायन, कूपर अशा रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि विस्तार शिवसेनेच्या काळात झाला. हजारो मराठी माध्यमाच्या शाळा चालवल्या, ज्यामुळे गरीब मुंबईकरांच्या मुलांना शिक्षण मिळाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशात सर्वोत्तम व्यवस्थापन केले. ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर्स, लसीकरण यात महाराष्ट्र आघाडीवर होता. उद्धव सरकारने आरेतील मेट्रो कारशेड कान्हेरी गुहेजवळ हलवले, ज्यामुळे आरे जंगल वाचले. पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक प्रकल्प रोखले. बेस्टला आर्थिक मदत, नवीन बस खरेदी, कर्मचाऱ्यांचे हित जपले. रस्त्यावरील विक्रेत्यांना परवाने आणि संरक्षण दिले. स्वच्छ मुंबई अभियानाला चालना दिली. आज महायुती सरकार यातील अनेक प्रकल्पांचे श्रेय घेते, पण मुंबईकरांना माहिती आहे की, या प्रकल्पांची सुरुवात आणि मुख्य गती शिवसेना-ठाकरे कुटुंबाच्या काळातच मिळाली. ‘शब्द ठाकरेंचा’ वचननाम्यातील ‘करून दाखवलेय आणि पुन्हा करून दाखवणार’ ही घोषवाक्य याच इतिहासावर आधारित आहेत. ठाकरे कुटुंबाने मुंबईला आकार दिला आहे आणि आता उद्धव-राज यांची युती पुन्हा तेच करून दाखवण्यासाठी सज्ज आहे. मुंबईचा मतदार जागा आहे आणि तो ठाकरेंच्या शब्दाला कधीच खाली पडू देणार नाही. कारण ठाकरेंमुळेच मुंबईचं महत्त्व टिकून आहे याची त्याला जाणीव आहे.

प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

कल्याणमध्ये महायुतीच्या प्रचार रॅलीत झेंडा हाय टेन्शन वायरला लागून स्फोट; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, घटनेचा Video व्हायरल

Mumbai : हार्बरवर एसी लोकलचं पुनरागमन! २६ जानेवारीपासून सेवा पुन्हा सुरू; १४ फेऱ्यांचं संपूर्ण वेळापत्रक बघा एकाच क्लिकवर

थायलंडमध्ये भीषण दुर्घटना! धावत्या ट्रेनवर अचानक क्रेन कोसळल्याने किमान २२ ठार, ३० जखमी; आकडा वाढण्याची भीती

'संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच'; लडाखच्या LG नी ठणकावले, शक्सगाम खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळला

अजित पवारांच्या 'डिझाईन बॉक्स'ची तपासणी! राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा; प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ