संपादकीय

आता मेट्रो गर्दीचे आव्हान

मेट्रो-१ मुळे मुंबईतील अंधेरी-घाटकोपर दरम्यान प्रवास सुकर झाला असला, तरी वाढती गर्दी ही मोठी समस्या आहे. चार डब्यांची मर्यादा, अपुरी पायाभूत सुविधा यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागते. वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.

नवशक्ती Web Desk

आपले महानगर

तेजस वाघमारे

मेट्रो-१ मुळे मुंबईतील अंधेरी-घाटकोपर दरम्यान प्रवास सुकर झाला असला, तरी वाढती गर्दी ही मोठी समस्या आहे. चार डब्यांची मर्यादा, अपुरी पायाभूत सुविधा यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागते. वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.

लोकलमधील गर्दी नित्याची झाली असतानाच आता यामध्ये भरीस भर मेट्रोची पडली आहे. गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघात होत असल्याने यावर उपाययोजना आखण्यात येत आहेत; मात्र मेट्रो-१मुळे उपनगरीय रेल्वे मार्गांवरील अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांमध्ये प्रचंड कोंडी होत आहे. यासोबत मेट्रोमध्येही प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांचा गारेगार प्रवासही दुःखकर झाला आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक खडतर होईल.

मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि गतिमान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो स्थानकांचा बृहत आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील पहिला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (मेट्रो १) प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात आला. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत आहे. मेट्रो १ मार्ग ८ जून २०१४ रोजी प्रवासी सेवेत दाखल झाला. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. उपनगरीय मार्गावरील प्रवाशांना दादर मार्गे प्रवास करावा लागत होता. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ खर्ची करावा लागत होता. या मार्गामुळे उपनगरीय लोकलचे प्रवासी मध्य रेल्वेच्या घाटकोपर आणि पश्चिम रेल्वेच्या अंधेरी मार्गावरून प्रवास करू लागले आहेत. प्रवाशांच्या वेळेची बचतही मेट्रो १ मुळे होत आहे.

मेट्रो मार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी प्रवाशांना अंधेरी-कुर्ला, घाटकोपर या रस्तेमार्गावर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत असे. यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि वाहतूककोंडीमुळे प्रदूषण वाढले होते. या मार्गावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी अग्निदिव्यासारखे असे. मात्र मेट्रो १ ने प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि वाहतूककोंडीमुक्त केला. या मार्गावरून दररोज ५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मार्ग ११.४० किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांचा भाग पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडला गेला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना अंधेरी व घाटकोपर स्थानकांवर अदलाबदल गाडी बदल करता येतो. यामुळे वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान लागणार प्रवासाचा वेळ ७१ मिनिटांवरून २१ मिनिटांवर आला आहे. त्यामुळे एमआयडीसी, साकीनाका, मरोळ नाका, पश्चिम द्रुतगती महामार्ग या परिसरातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपनगरीय लोकल स्थानकांशिवाय आता मेट्रो ३, मेट्रो ७, मेट्रो २ अ हे मार्ग जोडले गेले आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे मेट्रो १ मार्गावरील प्रवाशांच्या गर्दीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मेट्रो १ मार्गावर १२ स्थानके असून या मार्गावर सध्या ४ डब्याच्या गाड्या चालविण्यात येत आहेत. यामुळे गर्दीच्या वेळेत या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. डब्यांमध्ये घुसण्यास प्रवाशांना जागा उरलेली नाही. यामुळे दरवाजे बंद होण्यास अडचण येत आहे. गर्दीमुळे घाटकोपर स्थानकात पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मेट्रो १ चा नुकताच ११ वा वर्धापन दिन साजरा झाला. गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत या मार्गावर १२.६ लाखांहून अधिक रेल्वे फेऱ्या आणि १.४५ कोटी किलोमीटर प्रवास करून मेट्रो ९९.९९ टक्केच्या जवळजवळ परिपूर्ण वक्तशीरपणा दर आणि ९९.९६ टक्केची उपलब्धता राखली आहे. या मार्गावरील १२ स्थानकांपैकी घाटकोपर हे सुमारे ३० कोटी प्रवाशांसह अव्वल स्थानक बनले आहे. त्यानंतर अंधेरी २३ कोटी आणि साकीनाका ११ कोटी प्रवाशांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. घाटकोपर, अंधेरी स्थानकात प्रवाशांना गर्दीच्या वेळी पाय ठेवण्यास जागा नसते. त्यामुळे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. प्लॅटफॉर्मवर पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने फलाट गर्दीने फुलून जातात. यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर रोखून ठेवण्यात येते.

मेट्रो स्थानकात लाखोंच्या संख्येने प्रवासी येत असताना त्यांच्या बॅग स्कॅनिंग, प्रवाशांचे चेकिंग करताना उपलब्ध कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. सध्या मुंबई मेट्रो १ च्या ताफ्यात १६ गाड्या आहेत. या गाड्यांच्या मदतीने ३ मिनिटे ३६ सेकंदांच्या वेळाने गाडी चालविण्यात येत आहे. यानंतरही या मार्गावरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. यासाठी गर्दीच्या वेळेत घाटकोपर आणि अंधेरीदरम्यान शॉर्ट-लूप सेवा सुरू करण्यात आल्या. मात्र इतर स्थानकांमधील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. यामुळे ही सेवाही मेट्रोला बंद करावी लागली. अखेर यावर उपाय म्हणून मेट्रो १ प्रशासनाने अतिरिक्त कोच खरेदीचा निर्णय घेतला आहे.

या मार्गावरील स्थानके सहा डबे क्षमतेची आहेत. त्यामुळे गाड्यांना डबे वाढविल्यास काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळेल. मात्र त्यानंतरही प्रशासनाला अंधेरी आणि घाटकोपर स्थानकात होणाऱ्या गर्दीवर उपाय काढावाच लागेल. अन्यथा गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू शकतो. यामुळे रेल्वे आणि मेट्रो १ प्रशासनाने यावर उपाय शोधण्याची वेळ आली आहे.

सध्या चार डब्यांच्या गाडीमधून सुमारे ११७८ प्रवासी प्रवास करत आहेत. गाडीला सहा डबे जोडल्यास यामधून १७९२ प्रवासी प्रवास करू शकतील. प्रवाशांची गर्दी वाढत असतानाही प्रशासनानी याकडे वेळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रवासी गर्दीतून प्रवास करत आहेत. यामध्ये महिला प्रवाशांचे तर प्रचंड हाल होत आहेत. एकदा मेट्रोमध्ये प्रवेश केल्यास उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आता तर लोकलप्रमाणे मेट्रोचे प्रवासी अगोदरच गाडीमध्ये बसून येऊ लागले आहेत. सायंकाळी साकीनाका, मरोळचे प्रवासी अंधेरीला जाण्यासाठी घाटकोपरकडे येणाऱ्या गाडीत बसून येतात. गाडीतून न उतरता ते थेट पुन्हा परतीचा प्रवास करत वर्सोवाकडे जात आहेत. यामुळे गाडीत आणखी गर्दी वाढू लागली आहे.

२०३१ पर्यंत मेट्रो १ मार्गावरून दररोज आठ लाख ८३ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरडीएने वर्तविला होता. त्यामुळे मेट्रोच्या गर्दीच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकारने दुर्लक्ष केल्यास भविष्यात प्रवाशांचा प्रवास अधिक खडतर होईल. त्यामुळे प्रवासी सेवेसाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

tejaswaghmare25@gmail.com

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश