महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
‘प्रत्येक गावातील रस्ता सिमेंट-काँक्रीटचा’ अशी घोषणा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा दावा महायुतीने केला असला, तरी महामार्गावर देखभाल-दुरुस्ती अभावी खड्डेच खड्डे पडले आहेत.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार, असा दावा जुलै २०२२ मध्ये केला होता. मात्र आजही मुंबई शहर व दोन्ही उपनगरांतील १५ टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सिमेंट काँक्रीटचे रस्ते हे फक्त आश्वासन राहिले आहे. गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून, तो सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. या काळात लाखो भाविक आपापल्या गावी जातात. विशेषत: कोकणातील गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी मुंबई-गोवा महामार्ग हा मुख्य आधार आहे. मात्र गेली अनेक वर्षे या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून, खड्ड्यांचे साम्राज्य या मार्गावर वर्षानुवर्षे कायम असल्याचे चित्र आहे. मुंबई-गोवा या महामार्गाचे चौपदरीकरण आणि दर्जेदार काम होणार, अशी आश्वासने याआधीही अनेक सरकारांनी दिली. उद्घाटने झाली, निधी वाटपाचे दावे झाले; पण प्रत्यक्षात आजही मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर खड्ड्यांचे वर्चस्व असते. मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते अपघातात अनेक प्रवासी जखमी होत आहेत, तर काहींच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर प्रवासादरम्यान भीतीचे सावट कायम असते, यात दुमत नाही.
सध्याच्या महायुती सरकारकडून लोकांना अपेक्षा होती की, मुंबई-गोवा महामार्ग प्राधान्याने पूर्ण व्हावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजही अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे. काही ठिकाणी काम झाले असले तरी त्याचा दर्जा टिकाऊ नाही. काँक्रीटचा रस्ता झाला तिथेही दुरुस्तीची गरज भासते. मुंबई-गोवा महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले, पण देखभाल दुरुस्ती अभावी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर सरकारने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात कामाची गती असमाधानकारकच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासात वाहनचालकांना ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा खर्च होतोच, शिवाय मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. राज्यात सरकार कोणाचेही असो, निवडणूक जवळ आली की त्या त्या सरकारला मुंबई-गोवा महामार्गाची आठवण येते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम, कामातला वेळकाढूपणा यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या जीवाशी जो खेळ होतो, याची जबाबदारी मात्र कुणी स्वीकारत नाही, हे ही तितकेच खरे.
पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिला. मात्र हा इशारा कागदावरच न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तर आणि तरच बेफिकीर अधिकारी आणि कंत्राटदारांना काही वचक बसेल. आज गरज आहे ती ठोस कृतीची. केवळ घोषणांनी आणि तात्पुरत्या खड्डे बुजवण्याच्या उपायांनी हा प्रश्न सुटणारा नाही. प्रकल्पाला ठोस वेळापत्रक, दर्जेदार काम आणि कंत्राटदाराला जबाबदार धरण्याची कृती गरजेची आहे. कोट्यवधी रुपयांची कामे आणि दंड मात्र लाखोंचा यामुळे कंत्राटदारही बिनधास्त वावरत आहेत. त्यामुळे अधिकारी असो वा कंत्राटदार, एकदाच अद्दल घडेल अशी कारवाई केली तरच कामांचा दर्जा उंचावेल. अन्यथा मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य गणेशोत्सवाचा आनंद हिरावून घेत राहील. गणेशोत्सव हा आनंदाचा सोहळा असला, तरी प्रवासातील धोक्यामुळे तो त्रासदायक होऊ नये हीच जनतेची माफक अपेक्षा आहे. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. म्हणूनच राज्यकर्त्यांना खरी सुबुद्धी दे, त्यांना आठवण करून दे की सत्ता ही जनसेवेसाठी असते, स्वार्थासाठी नसते, असे साकडे लोक गणरायाला घालत आहेत. महायुती सरकारने जर खऱ्या अर्थाने लोकांप्रति उत्तरदायित्व दाखवले नाही, तर मात्र जनतेच्या नाराजीचे रूपांतर पुढच्या निवडणुकीत विरोधी मतांच्या रूपांत होणार हे उघड आहे.
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, महागाईला आळा, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सुधारणा इत्यादी. पण प्रत्यक्षात काय झाले?
सरकारचे अधिक लक्ष सत्तेतील समतोल साधण्यात, खुर्ची टिकविण्यात आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आहे. त्यामुळे जनतेचे मूलभूत प्रश्न आजही धूळखात पडले आहेत. वाढत जाणारे खड्डे हा त्यातलाच एक प्रश्न आहे.
gchitre4@gmail.com