संपादकीय

पंजाबमधील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ

धर्माच्या नावाने चालणाऱ्या या भिंदनवालेच्या उच्छादाला लोक कंटाळले होते. लोक एका नव्या पर्यायाच्या शोधात होते. तर्कशील सोसायटीच्या माध्यमातून पंजाबमधील जनतेला एक पुरोगामी पर्याय मिळाला.

नवशक्ती Web Desk

भ्रम-विभ्रम

राहुल थोरात

१९८४ च्या खलिस्तान आंदोलनामुळे संपूर्ण पंजाब अशांत होता. भिंद्रनवालेकडून धर्माच्या नावावर तरुणांना भडकावले जात होते. पण त्याविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी तरुणांना चिथावले जात होते. अशा कडव्या धार्मिक वातावरणाचा पंजाबी जनतेला तिटकारा आला होता. धर्माच्या नावाने चालणाऱ्या या भिंदनवालेच्या उच्छादाला लोक कंटाळले होते. लोक एका नव्या पर्यायाच्या शोधात होते. तर्कशील सोसायटीच्या माध्यमातून पंजाबमधील जनतेला एक पुरोगामी पर्याय मिळाला.

ऐंशीच्या दशकात पंजाबमधील काही विचारी तरुणांच्या हाती सुप्रसिद्ध बुद्धिवादी आणि भारतातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पितामह डॉ. अन्नाहम कोवूर यांचे 'बिगॉन गॉडमेन' (Begone Godmen) हे पुस्तक पडले. त्यांनी 'और देवपुरुष हार गये' या नावाने त्या पुस्तकाचा पंजाबी अनुवाद केला. पंजाबमध्येही विविध अंधश्रद्धा होत्या. भूत- भानामती, अतिंद्रिय शक्तीवर लोकांचा मोठा विश्वास होता. त्यामुळे याच विषयावर काम करायचे, असे या मित्रांनी ठरविले. या पुस्तकाच्या आधारे हरदीप टपेवाल, जीवन लाल साहिना, नरेन्द्र पिंडी, सूरजीत तलवार, मेघराज मित्र, अनुराग अरोही, अजमेर पलकडा या बुद्धिवादी तरुणांनी गावोगावी जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनावर भाषणे द्यायला सुरुवात केली. १६ ऑगस्ट १९८६ रोजी भदौठ गावी झालेल्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'तर्कशील सोसायटी पंजाब'ची अधिकृत स्थापना केली गेली. 'तर्कशील' याचा अर्थ 'विवेकवादी'.

सुरुवातीच्या काळातला प्रचार प्रसार

त्यावेळी पंजाबात भुताने झपाटणे, भानामतीमुळे घराला आग लागणे, अशा घटनांवर विश्वास ठेवला जाई. तेव्हा 'तर्कशील'चे कार्यकर्ते या घटनांमागचे कारण शोधण्यासाठी गावोगावी जायचे. या घटनेमागचे सत्य शोधायचे, या घटना दैवीशक्तीमुळे न घडता कोणत्या तरी अतृप्त माणसाद्वारेच घडवल्या जातात, हे सत्य लोकांसमोर आणायचे, या कामाला पंजाबच्या वर्तमानपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली.

धर्मांध शक्तींकडून विरोध -

तर्कशील सोसायटीचे काम हे पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ सक्रिय असतानाच सुरू झाले होते. त्यामुळे साहजिकच या खलिस्तानवादी मंडळींकडून तर्कशीलला प्रखर विरोध सुरू झाला. ते अपप्रचार करायचे की, 'ये तर्कशीलबालें परमात्माकों नहीं मानते। ये अपने सीख धर्म के खिलाफ हैं।', असा प्रचार होऊ लागला. त्यांच्या या चिथावणीमुळे तर्कशीलच्या कार्यक्रमाला लोक यायचे नाहीत. तरीही काही कार्यकर्त्यांनी हे काम चिकाटीने सुरूच ठेवले. तर्कशील सशस्त्र पहारा ठेवायला लागायचा. परवानाधारक बंदुकधारी कार्यकर्ते 'तर्कशील' च्या कार्यक्रमांना संरक्षण द्यायचे, तर्कशील शहीद-ए-आझम भगतसिंगाचाच क्रांतिकारी वैचारिक वारसा पुढे चालवत आहे, असे कार्यकर्ते सांगायचे.

तर्कशील संघटनेचे स्वरूप -

तर्कशील ही संघटना संपूर्ण विवेकवादावर उभी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविणे, धार्मिक प्रथा- परंपरांची चिकित्सा करणे, त्याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, असा त्यांचा कार्यक्रम असतो. तर्कशीलचा कार्यकर्ता नशा न करणारा असावा, जात धर्म-गोत्र न मानणारा असावा, अशा अटीही आहेत. सध्या पंजाबमध्ये तर्कशीलची ८० युनिट्स कार्यरत आहेत. पंजाबबरोबरच शेजारच्या हरियाणा, जम्मू या राज्यांत शाखा आहेत. त्याचबरोबर देशाबाहेर कॅनडा, न्युझीलंड, बर्निंगहॅम आणि इंग्लंड येथेही शाखा आहेत. हे सर्व काम कार्यकर्ते विनामोबदला करतात. तर्कशीलचे कार्यकर्ते आपल्या नावासमोर जातीवाचक आडनावे लावत नाहीत, तर गावाची नावे लावतात. आपल्या मुला-मुलींची लग्ने रजिस्टर पद्धतीने करतात. पंजाबमधील लग्नांमध्ये प्रचंड प्रमाणात दारू वाटली जाते. मात्र तर्कशीलचे कार्यकर्ते लग्नामध्ये दारू वाटत नाहीत. मृत्यूनंतर देहदान करतात.

तर्कशील मासिक, पुस्तके -

बर्नाला येथून 'तर्कशील' या नावाचे मासिक पंजाबी भाषेमध्ये तर 'तर्कशील पथ' हे द्वैमासिक हिंदीमध्ये प्रसिद्ध होते, यामध्ये वैचारिक लेख, चमत्काराचे प्रयोग, भानामतीच्या, बुवा भांडाफोडीच्या केसेस प्रसिद्ध केल्या जातात. शंभरपेक्षा जास्त विषयांवर तर्कशील सोसायटीने पुस्तके काढली आहेत. या पुस्तकांच्या विक्रीसाठी त्यांनी सुसज्ज अशी गाडी तयार केली आहे. ही गाडी गावोगावच्या शाळा-शाळांमध्ये जाऊन पुस्तकांची विक्री करते.

मनोरोग मशवरा केंद्र -

कार्यकर्ते जेव्हा गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या केसेस हाताळायचे तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, यातील अनेक लोकं सौम्य मानसिक आजाराने पीडित आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून तर्कशील सोसायटीने 'मानसिक आरोग्य आधार केंद्र' सुरू केले. इथे मानसिक रुग्णांना समुपदेशन केले जाते.

तर्कशील मेला -

पंजाबमध्ये 'धार्मिक मेला' भरवण्याची जुनी परंपरा आहे. याच धर्तीवर 'तर्कशील मेला' सुरू करण्यात आला आहे. यात एखाद्या ग्रामीण भागात जाऊन तर्कशील कार्यकर्ते मंडप घालतात. त्यामध्ये लोकांना एकत्र करून पंजाबी नृत्य, पुरोगामी पंजाबी नाटके, लोकगीताच्या चालीवर बुद्धिवादी गीते सादर केली जातात. जादूचे प्रयोग दाखविले जातात. विविध विषयांवर व्याख्याने दिली जातात. हजारो लोक यात सामील होतात.

दाभोलकरांचा विचार पंजाबमध्ये

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर तर्कशील सोसायटीच्या वतीने जालंधर येथे तीन हजार लोकांचा भव्य मोर्चा काढला गेला. असा मोर्चा जालंधरमध्ये गेल्या २० वर्षांत झाला नव्हता. त्यानंतर तर्कशील सोसायटीने डॉ. दाभोलकरांचा फोटो असणारे कॅलेंडर प्रसिद्ध केले. त्याच्या १० हजार प्रती पंजाबच्या गावागावांत वाटण्यात आल्या. तर्कशील मासिकाचा 'दाभोलकर विशेषांक' प्रसिद्ध करण्यात आला. ते डॉ. दाभोलकरांना 'तर्कशील लहर के नायक' मानतात.

डॉ. दाभोलकर यांच्या नावाचा पुरस्कार -

'महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका' यांच्या वतीने दिला जाणारा 'डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार' हा तर्कशील सोसायटीला दिला गेला. यावेळी बोलताना तर तर्कशीलचे अध्यक्ष राजिंद्र भदौढ म्हणाले होते की, "महाराष्ट्रात डॉ. दाभोलकरांनी संघटित पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे जे प्रचंड काम उभे केले आहे, याच कामाची प्रेरणा घेऊन आम्ही पंजाबमध्ये हे काम करतोय. पंजाबमध्ये आता या कामाला तसा विरोध होत नाही. परंतु या कामाला सुधारणावादी महाराष्ट्रामध्ये विरोध होतोय, याचे आम्हाला सखेद आश्चर्य वाटते. हा विरोध खुनापर्यंत जाईल याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती; पण धर्मांधांनी हे काम केले. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर आमचे या कामातील पितामह गेले, अशी आमची भावना झाली. आमच्या कामाची पावती म्हणून आमच्या पितामहंच्या नावाचा पुरस्कार आमच्या संघटनेला मिळतोय, याचा मनस्वी आनंद होत आहे; पण सध्या देशात जे धर्माच्या नावाने लोकांना चिथावण्याचे काम सुरू आहे, लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे, अशा काळात आम्हाला हा पुरस्कार मिळतोय, याचेही भान आम्हाला आहे. फिर भी दाभोलकरजी का अधुरा काम हम पुरा करेंगे, ये विश्वास हम आपको देते है।"

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.)

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?