मागील काही दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. त्यांच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध केला गेला होता. आता पुन्हा एकदा सदावर्ते यांच्या एका मोर्च्यात पुन्हा नथुराम गोडसेचे फोटो झळकले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खरं तर, एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचं मतमोजणीच्या ठिकाणी सदावर्ते हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह आले. यावेळी त्यांच्या हातात विविध महापुरुषांचे फोटो होते. यावेळी सदावर्ते यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नथुराम गोडसेच्या नावाने देखील घोषणा देण्यात आल्या.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ती बँक एसटी कर्मचाऱ्यांची आहे. त्याची निवडणूक झाली असून त्याठिकाणी हा निवडून येतो किंवा तो निवडून येतो, याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी फडणवीस यांनी नथुराम गोडसेंवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. या देशात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं योग्य नाही. या देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल. गोडसेचा विचार चालू शकत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.