मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरुन मुंबईच्या दिशेने परतत असताना, नाशिकच्या सिन्रर तालुक्यातील टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन मनेसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यानंतर अमित ठाकरे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता. त्यांनी टोल प्रशासनाने उद्धट बोलल्याचं सांगितलं. तसंच साहेबांमुळे महाराष्ट्रातील ६५ टोलनाके बंद झाले माझ्यामुळे अजून एकाची भर पडली, असं देखील ते म्हणाले.
याप्रकरणानंतर महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन अमित ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. हे भाजप सरकार असून दादागिरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यानंतर मनसेनेदेखील भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मात्र, स्वत: राज ठाकरे यांनी यावर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता राज ठाकरे यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे. राज ठाकरे सध्या पूणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. आगामी निवडणूकच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षबांधणी करत आहेत.
नाशिक टोलनाका तोडफोड प्रकरणी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अमित सध्या महाराष्ट्रभर दौरा करतोय. तो काही टोलनाके फोडत चालला आहे
असं नाही. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला. अमितची गाडी त्या टोलनाक्यावर बराच काळ उभी होती. त्याच्या कारवर फास्ट टॅगही होता. तरी देखील त्याला थांबवून ठेवलं होतं.
टोल भरल्याचं तो त्यांना सांगत होता. तरी त्याला थांबवलं. त्यानंतर ही फोडाफोडी झाली. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरु होता आणि समोरचा माणूस त्यावरुन उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही. असं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. भाजपने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. त्याचं काय झालं? ते सांगावं. एका म्हैस्कर नावाच्या माणसाला हे टोलनाके मिळतात, हा कोण लाडका आहे. यावही बोलावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.