क्रीडा

बीसीसीआयने महिला आणि ज्युनियर स्तरावरील अंपायरिंगच्या परीक्षेत इच्छुकांची पाहिली सत्वपरीक्षा

या परीक्षेत १४० जण सहभागी झाले. मात्र बीसीसीआयच्या तीन प्रश्नांच्या गुगलीवर यातील १३७ जण त्रिफळाचीत झाले

वृत्तसंस्था

क्रिकेटमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने फिल्ड अंपायरचे काम सोपे झाले असले, तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मात्र (बीसीसीआय) महिला आणि ज्युनियर स्तरावरील अंपायरिंगच्या परीक्षेत इच्छुकांची ‘सत्वपरीक्षाच पाहिली.

या परीक्षेत १४० जण सहभागी झाले. मात्र बीसीसीआयच्या तीन प्रश्नांच्या गुगलीवर यातील १३७ जण त्रिफळाचीत झाले. उमेदवारांची सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या या कठिण परीक्षेत फक्त तिघेजण उत्तीर्ण झाले.

बीसीसीआयने महिला आणि ज्युनियर स्तरावरील (ग्रुप 'ड') अंपायरिंगसाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत सुमारे ४० अवघड प्रश्न विचारण्यात आले. बीसीसीआयने या परीक्षेतील प्रश्न अवघड असल्याचे मान्य केले; मात्र गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही स्पष्ट केले. जर पॅव्हेलियनच्या काही भागाची सावली, झाड किंवा क्षेत्ररक्षकाची सावली खेळपट्टीवर पडली आणि फलंदाजाने त्याची तक्रार केली तर त्यावेळी तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे योग्य उत्तर अनेकांना देता आले नाही. योग्य उत्तर असे की, पॅव्हेलियन आणि झाडाच्या सावली फारशी विचारात घेतली जाणार नाही; मात्र क्षेत्ररक्षकाला स्थिर राहण्यास सांगितले जाईल किंवा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल.

गोलंदाजाच्या हाताला दुखापत झालेली असताना गोलंदाजाला पट्टी हटवून गोलंदाजी करण्यास सांगाल का? या प्रश्नाचे अचूक उत्तर जर गोलंदाजाला गोलंदाजी करायची असेल तर त्याला हाताला लावलेली पट्टी काढावी लागेल, असे आहे.

तिसरा प्रश्न पंच होण्यास इच्छुक असलेल्यांची कसोटी पाहणाराच होता. फलंदाजाने फटकावलेला चेंडू शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटमध्ये अडकला. चेंडूमुळे हेल्मेट खाली पडले; मात्र चेंडू खाली जमिनीवर पडण्याआधीच क्षेत्ररक्षकाने झेल टिपला, तर फलंदाजाला बाद ठरतो का? या प्रश्नाचे बिनचूक उत्तर फलंदाज नाबाद असे आहे. या तिन्ही प्रश्नांवर तिघेजण वगळता उर्वरित सर्वजण त्रिफळाचीत झाले. बीसीसीआयने अंपायरिंगच्या परीक्षेत असे अनेक क्लिष्ट प्रश्न विचारले. बीसीसीआयने ही परीक्षा तीन भागात घेतली. यात प्रॅक्टिकल, मुलाखत आणि तिसऱ्यात व्हिडिओ आणि लेखी परीक्षा यांचा समावेश होता. अनेक अंपायर लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, परीक्षा नक्कीच अवघड होती. मात्र आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू इच्छित नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरील सामन्यात अंपायरिंग करायची असेल तर चुकीला माफी नाही. खेळाची जाण आणि नियमांचे पूर्ण ज्ञान खूप आवश्यक आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल