नवी दिल्ली : ड्रीम ११ ने भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशीपचे (प्रायोजकत्वासाठी) हक्क काढून घेतल्यानंतर बीसीसीआय नव्या टायटल स्पॉन्सरच्या शोधात आहे. मंगळवारी बीसीसीआयने त्याकरिता निविदा मागवल्या आहेत. सरकारने बंदी घातलेल्या रिअल मनी गेमिंग आणि क्रिप्टो करन्सीसारख्या कंपन्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई आहे.
बीसीसीआयने निविदा सादर करण्याला १६ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे यूएईमध्ये ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ टायटल स्पॉन्सरशीपशिवाय खेळणार आहे.
ड्रीम ११ ने अलीकडेच आपली रिअल मनी गेम सेवा बंद केली आहे. कारण कायद्यानुसार ऑनलाइन मनी गेमिंग सेवा देणे, त्याचा प्रचार करणे किंवा त्यास प्रवृत्त करणे प्रतिबंधित आहे. तसेच आधीचे टायटल स्पॉन्सर ड्रीम ११ ने भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क काढून घेतले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय नव्या प्रायोजकत्वाच्या शोधात आहे. मंगळवारी बीसीसीआयने त्याकरिता निविदा मागवल्या आहेत.
रिअल मनी गेमिंग व क्रिप्टो करन्सी कंपन्यांना बंदी
कोणतीही निविदादार कंपनी किंवा तिच्या सहयोगी कंपन्या या भारतात किंवा जगात कुठेही ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टा, जुगार यामध्ये गुंतलेली नसावी. अशा सेवांचा कोणत्याही स्वरूपात प्रचार किंवा गुंतवणूकही नसावी.
निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असलेल्या क्षेत्रांमध्ये रिअल मनी गेमिंग/क्रिप्टो, तंबाखू, दारू, अश्लिलता/अश्लील कंटेंटशी संबंधित उद्योग यांचा समावेश आहे.