भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच आशिया चषकावर आपले नाव कोरले. गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाने त्यांच्या खेळात केलेल्या अफाट सुधारणांनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा दिसून येतो. यानंतर बीसीसीआयनेही एक मोठे पाऊल उचलले असून महिला क्रिकेटपटूंनाही पुरुष क्रिकेटपटूं इतकेच वेतन मिळणार असल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता खेळाडूंना कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यांसाठी 6 लाख आणि टी-20 सामन्यांसाठी 3 लाख मिळणार आहेत.
जय शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. बीसीसीआयने लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे हे सांगताना आनंद होत असल्याचे जय शाह म्हणाले. आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी आम्ही वेतन समानता धोरण लागू करत आहोत, असे ते म्हणाले.
काय म्हणाले जय शहा ?
या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांनाही समान मॅच फी असेल. यापुढे महिला खेळाडूंनाही समान मॅच फी दिली जाईल. पुरुष. कसोटी क्रिकेटमध्ये पुरुषांना प्रति सामन्यासाठी 15 लाख रुपये मानधन दिले जाते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना प्रति सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना प्रति सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात.