क्रीडा

स्टार्कची चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार; स्मिथ कर्णधार

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलिया संघाला एकामागून एक धक्के बसण्याची परंपरा कायम आहे.

Swapnil S

सिडनी : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलिया संघाला एकामागून एक धक्के बसण्याची परंपरा कायम आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल मार्श हे खेळाडू आधीच दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहेत. आता डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेसुद्धा वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले आहे. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेत नेतृत्व करेल.

विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह ब-गटात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने १३ जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला होता. मात्र बुधवारी त्यांनी या संघांत तब्बल ५ बदल केले. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी याविषयी माहिती दिली. कमिन्स पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. तसेच हेझलवूडला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्नायूंच्या दुखापतींने हैराण केले. त्यामुळे तो आणखी महिनाभर तरी क्रिकेटकडे वळणार नाही. त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने एकदिवसीय प्रकारातून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. मिचेल मार्शही स्नायूंच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणार नाही. मात्र आता स्टार्कनेही वैयक्तिक कारण देत या स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी फळीची स्थिती बिकट आहे. स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस, सीन ॲबट यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त असेल.

असलंकामुळे श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का

कर्णधार चरिथ असलंकाने (१२६ चेंडूंत १२७ धावा) बुधवारी कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी साकारली. त्याला फिरकीपटूंची उत्तम साथ लाभली. त्यामुळे श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४९ धावांनी पराभूत केले. याबरोबरच श्रीलंकेने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४६ षटकांत सर्व बाद २१४ धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ ३३.५ षटकांत १६५ धावांत गारद झाला. कॅरीने त्यांच्याकडून स‌र्वाधिक ४१ धावा केल्या. स्मिथ (१२), लबूशेन (१५) यांनी निराशा केली.

गझनफर दोन्ही स्पर्धांना मुकणार

अफगाणिस्तानचा १८ वर्षीय फिरकीपटू अल्लाह गझनफर पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसह आयपीएललाही मुकणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने गझनफरला ४.८ कोटी रुपयांत खरेदी केले होते.

अफगाणिस्तानच्या संघात गझनफरच्या जागी २० वर्षीय डावखुरा फिरकीपटू नंगेयालिया खरोटेचा समावेश करण्यात आला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत गझनफरला दुखापत झाली. त्यामुळे तो आता थेट मे महिन्याच्या अखेरीसच मैदानात परतेल. आयपीएळ २१ मार्च ते २५ मे या कालावधीत रंगणार आहे. तसेच मुजीब उर रहमानही यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानपुढील आव्हानही कठीण असेल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली