क्रीडा

रोहितवरील दडपण कमी करण्यासाठी नेतृत्वबदल! मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक बाऊचर यांचे स्पष्टीकरण

Swapnil S

नवी दिल्ली : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय अवघड होता. मात्र, त्याच्यावरील दडपण कमी करण्यासाठी आणि फलंदाज म्हणून त्याला मोकळेपणाने खेळता यावे यासाठी नेतृत्वबदल करणे गरजेचे झाले होते, असे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी दिले.

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले आहे. मात्र, आगामी हंगामासाठी रोहितऐवजी अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची कर्णधारपदी निवड करण्याचा मुंबईच्या व्यवस्थापनाने निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर समाजमाध्यमांवरून मुंबईच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वगुणांवर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे बाऊचर म्हणाले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने २०२२मध्ये ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले, तर गतवर्षी हा संघ उपविजेता ठरला होता. मात्र, त्यानंतर हार्दिकने गुजरात संघ सोडून मुंबईकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती मान्यही झाली.

“हार्दिकला परत मिळवण्याची आम्हाला संधी दिसली आणि आम्ही त्या दृष्टीने पावले उचलली. मात्र, यामुळे रोहितचे महत्त्व कमी झालेले नाही. खेळाडू म्हणून रोहित आमच्यासाठी आजही तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या दोन हंगामांमध्ये रोहितने कर्णधार म्हणून यश मिळवले असले, तरी फलंदाजीत त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर नेतृत्वबदल करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे आम्हाला वाटले,” असे बाऊचर एका मुलाखतीत म्हणाले.

“रोहित अजूनही भारताचा कर्णधार आहे. त्यामुळे रोहितबाबतची चर्चा कमी होणार नाही. परंतु ‘आयपीएल’मध्ये त्याला मोकळेपणाने खेळता यावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच त्याला कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याचीही संधी मिळेल,” असेही बाऊचर यांनी सांगितले.

“रोहितसोबत वेळ घालवल्यानंतर मला एक गोष्ट समजली आहे आणि ती म्हणजे तो खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे तो एखाद्या ठिकाणी दाखल झाला की सर्वाचे लक्ष त्याच्याकडेच जाते. त्याचे छायाचित्र टिपण्याचा सर्वाचा प्रयत्न असतो. त्याला या गोष्टींनाही वेळ द्यावा लागतो,” असेही बाऊचर यांनी नमूद केले. आयपीएलचा आगामी हंगाम मार्चअखेरीस सुरू होईल.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार